राज्यात पावणेदोन महिन्यात १५ वाघांचे मृत्यू झाले आहेत. त्यापैकी ४ वाघांची शिकार, ८ नैसर्गिक आणि २ अपघाती मृत्यू झाले. देशात सर्वाधिक वाघमृत्यू महाराष्ट्रात झाले असून, मध्य प्रदेशात ११ आणि देशभरात ४३ वाघ दगावले. केरळ, आसाम, उत्तराखंड आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी ३ वाघांचे मृत्यू झाल्याची माहिती राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने दिली आहे.
देशात वाघांची संख्या झपाट्याने वाढली असून, २०२२ च्या आकडेवारीनुसार देशात एकूण ३,६८२ वाघ आहेत. वाघांचे नंदनवन मानल्या जाणाऱ्या मध्य भारतातील जंगलांकडे शिकाऱ्यांचे लक्ष वाढले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात केवळ दोन महिन्यांत चार वाघांची शिकार झाली. देशातील सुमारे ७०% वाघ मध्य भारतात असल्याने त्यांना धोका वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.
विकासकामांमुळे वाघांच्या नैसर्गिक अधिवासात मोठी घट झाली आहे. यामुळे त्यांच्यात अन्न व जागेवरून संघर्ष वाढत आहे. त्याचबरोबर शिकार, आपसी वर्चस्वाच्या लढाया, वृद्धापकाळ आणि रस्ते अपघात यामुळेही वाघांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.
सध्या शिकारी पुन्हा सक्रिय झाल्याने वनविभागाच्या चिंता आणखी वाढल्या आहेत. त्यामुळे वनविभागाने जंगलात सतर्कतेचे निर्देश दिले असून, वन कर्मचार्यांची गस्त वाढवण्यात आली आहे. वाघांच्या संरक्षणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, गस्त दलांची संख्या वाढविणे आणि लोकसहभाग वाढविण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत.
मध्य भारतात वाघ पाहण्यासाठी लाखो पर्यटक येत असतात शिकाऱ्यांचीही वाघांवर नजर असते.
बहेलिया शिकारी वाघाला 'पागल' प्राणी असे म्हणतात, कारण तो आपल्या ठराविक मार्गानेच नियमितपणे भ्रमंती करत असतो. त्यामुळे त्याच्या हालचालीचा अंदाज घेत शिकाऱ्यांना त्याची शिकार करणे सोपे जाते.
"महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील वाघांची संख्या वाढत असल्याने काही प्रमाणात नैसर्गिक मृत्यू अपरिहार्य आहेत. मात्र, जे मृत्यू शिकारीमुळे होत आहेत, ते अत्यंत चिंताजनक बाब आहे." असे बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीचे संचालक, किशोर रिठे यांनी म्हटले आहे.
Edited By - Purva Palande
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.