महाराष्ट्रातील काही भागांत पुन्हा पावसाला पोषक वातावरण
कोकणासह ८ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट
काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाच्या सरी
सोलापूरमध्ये ३६.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद
राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून काही ठिकाणी तापमान वाढल्यामुळे नागरिकांना उन्हाचा चटका सोसावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात चढ-उतार सुरू असून, काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही भागांत कडक ऊन अशी स्थिती आहे. दरम्यान, आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत पुन्हा पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित भागांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः दुपारनंतर वातावरणात बदल होऊन मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
विजांसह पावसाची शक्यता लक्षात घेता रायगड, रत्नागिरी, नाशिक घाटमाथा, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली या भागांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी पडू शकतात. पावसाची शक्यता असली तरी राज्यातील काही भागांमध्ये कमाल तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे दिवसा उन्हाचा चटका जाणवत आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही शहरांमध्ये तापमान ३५ अंशांच्या पुढे नोंदवण्यात आले आहे.
राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सोलापूर येथे ३६.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ अमरावती ३६ अंश, छत्रपती संभाजीनगर ३५.८ अंश आणि अकोला ३५.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. दरम्यान, राज्यात एकाच वेळी पाऊस आणि वाढते तापमान अशी संमिश्र हवामानस्थिती पाहायला मिळत आहे. पुढील काही दिवसांतही राज्यातील विविध भागांत हवामानात बदल होण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.