सूरज मसुरकर, साम टीव्ही
मुंबई : राज्यात महायुतीला संख्याबळ मिळाल्यानंतर त्यांची वाटचाल सत्ता स्थापनेकडून सुरु झाली आहेत. सध्या महायुतीकडे २३० आकडा आहे. तर निवडणुकीच्या निकालानंतर अपक्ष आमदार आणि इतर पक्षांनी देखील महायुतीतील पक्षांना समर्थन दिलं आहे. त्यामुळे महायुतीच्या संख्यबळात आणखी भर पडली आहे. याचदरम्यान, राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शिवसेना फुटीनंतर दोन्ही गट पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीला सामोरे गेले. या निवडणुकीत ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. तर शिंदे गटाला मोठा फायदा झाला. शिंदे गटाचे तब्बल ५७ आमदार निवडून आले आहेत. तर ठाकरे गटाच्या फक्त २० आमदार निवडून आले आहेत. ठाकरे गटासहित महाविकास आघाडीच्या आमदारांमध्येही मोठी घट झाली. महाविकास आघाडीचे फक्त ४६ आमदार निवडून आले आहेत. या विजयामुळे महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महायुतीच्या या त्सुनामीनंतरही महाविकास आघाडीतील अनेक आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे. महायुतीला मिळालेल्या दणदणीत विजयानंतर महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये अस्वस्थता परसल्याची चर्चा आहे.
काही आमदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर विरोधी पक्ष मजबूत नसल्याने विकास कामांना गती मिळावी, यासाठी आमदार शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर आता साऱ्यांचं मुख्यमंत्री कोण होणार, याकडे लागलं आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? याबाबत आज दिल्लीत महत्वपूर्ण बैठक होण्याची शक्यता आहे. आज दुपारी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती मिळत आहे.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कौटुंबीक कार्यक्रमासाठी तिन्ही नेते दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. या संध्याकाळच्या बैठकीत महायुतीच्या नव्या सरकार बाबतची रुपरेषा ठरण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.