महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत वाद
मविआच्या बैठकीत २३ आमदार गैरहजर
शरद पवारांसह अनेक मोठे नेते बैठकीला अनुपस्थित
उद्धव ठाकरे यांनी आघाडीच्या एकजुटीवर थेट प्रश्न केला उपस्थित
महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एका मोठ्या उलथापालथाची चिन्ह दिसत आहेत. महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत वाद सुरू असल्याची चर्चा पुन्हा होऊ लागली आहे. या मागचे कारण म्हणजे बुधवारी संध्याकाळी झालेल्या महाविकास आघाडीच्या महत्वपूर्ण बैठकीला ६० पैकी २३ आमदार गैरहजर होते. आमदारांव्यतिरिक्त या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील आले नाहीत. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा होऊ लागल्या आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या सहा विश्वासू खादारांनी नुकताच पक्षाची साथ सोडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या महाविकास आघाडीच्या या बैठकीला आमदार आणि नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे आघाडीच्या भवितव्याबाबत मोठे प्रश्न निर्माण झाले आहे. या कठीण काळात उद्धव ठाकरे यांचे दु:ख देखील उफाळून आले. त्यांनी या बैठकीत सर्वांना एकच प्रश्न विचारला की, 'आपण खरोखरच एकत्र आहोत का?'
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी रणनीती आखण्यासाठी प्रामुख्याने बोलावण्यात आलेल्या या महत्वपूर्ण बैठकीमध्ये अनेक प्रमुख नेते आणि आमदार हजर नव्हते. २३ आमदार अचानक गैरहजर राहिले. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून शरद पवार आणि जयंत पाटील हे देखील या बैठकीला आले नाहीत. ते वैयक्तिक कारणांमुळे येऊ शकले नाहीत अशी माहिती समोर आली.
काँग्रेस नेते नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार हे देखील या बैठकीला आले नाहीत. वडेट्टीवार यांची प्रकृती ठीक नसल्याने ते येऊ शकले नाहीत असे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि ठाकरेंचे खासदार संजय राऊत हे हजर होते. मागच्या आठवड्यात ठाकरेसेनेच्या ६ खासदारांनी पक्षाची साथ सोडत शिंदेसेनेत प्रवेश केला. चार वर्षात दुसऱ्यांदा शिवसेनेत फूट पडल्याने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला. त्यांनी या बैठकीत नाराजी व्यक्त केली.
उद्धव ठाकरे यांनी आघाडीच्या नेत्यांना थेट 'आपण खरोखर एकत्र आहोत का?', असा प्रश्न विचारला. बंडखोर खासदारांचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले की, आपण आपल्यासोबत असलेल्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. जे निघून गेले. त्यांना जाऊ द्या, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी प्रश्न विचारला की, 'आपण म्हणतो की आपण एकत्र आहोत. पण सभागृहात महाविकास आघाडी म्हणून आपण एकजूट आहोत का? आपण एकत्र मुद्दे मांडतो का?', असं देखील ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.