लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा फटका बसला. याची पुनरावृत्ती आगामी विधानसभा निवडणुकीत होऊ नये म्हणून अजित पवार सतर्क झाले आहेत. त्यांनी नव्याने पक्ष उभारणीचे काम हाती घेतले असून कार्यकर्त्यांची जमवाजमव सुरु केली आहे. मात्र, पक्ष उभारताना अजित पवार यांनी महायुतीतील घटक असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेलाच मोठा धक्का दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील शिवसेना शिंदे गटाचे (Shivsena Eknath Shinde) माजी आमदार नितीन पाटील यांनी आज आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला आहे. नितीन पाटील पाटील हे कन्नडचे माजी आमदार आहेत.
तसेच ते छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक देखील आहेत. कन्नड विधानसभा मतदारसंघात त्यांची मोठी ताकद आहे. शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांचे विश्वासू नेते म्हणून नितीन पाटील यांची ओळख आहे. मात्र, आज त्यांनी शिवसेना शिंदे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे.
दरम्यान, नितीन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये अजित पवार (NCP Ajit Pawar) यांची ताकद वाढली आहे. दुसरीकडे एका दिग्गज नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने शिवसेना शिंदे गटाचे काही नेते तसेच पदाधिकारी नाराज झाल्याचं कळतंय. नितीन पाटील यांना अजित पवार गटाकडून विधानसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणूक म्हटलं तर कन्नड लोकसभा मतदारसंघाची नेहमीच चर्चा होते. कारण, हा मतदारसंघ कोणत्याही एका पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला नाही. २०१९ मध्ये या मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते हर्षवर्धन जाधव तर उद्धव ठाकरे गटाकडून उदयसिंह राजपूत यांच्यात लढत झाली होती. यात राजपूत विजयी झाले होते.
आता शिंदे गटाकडून उदयसिंह राजपूत यांच्याविरोधात नितीन पाटील यांना उमेदवारी देण्याची तयारी होती. काही दिवसांपूर्वी आपण शिवसेनेकडून निवडणूक लढवणार, असंही पाटील यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र, आता त्यांनी थेट अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने महायुतीत कन्नड विधानसभा मतदारसंघाची जागा अजित पवार यांच्या वाट्याला येणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.