अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली. अजितदादांसोबत अनेक आमदार महायुती सरकारमध्ये सहभागी झाले. मात्र, त्यानंतर शरद पवार यांनी आपल्यासोबत असलेल्या इतर आमदारांना घेऊन नव्याने पक्षाची उभारणी केली. इतकंच नाही तर, तुतारी चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढवून त्यांनी ८ खासदार देखील निवडून आणले. आता अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना पुन्हा परतीचे वेध लागले आहे.
नुकतेच अजित पवार (Ajit Pawar) गटाचे माजी आमदार बाबाजानी दुराणी यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. छत्रपती संभाजीनगर शहरात हा प्रवेश सोहळा पार पडला. दुरानी हे परभणीतील पाथरीचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांनी अचानक साथ सोडल्याने अजित पवार गटाला मोठा धक्का बसलाय. आता दुरानी यांच्यापाठोपाठ अजित पवार यांना आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
कारण, अजित पवार गटाच्या एका आमदाराने थेट शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पुणे येथील कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. सातारा जिल्हा मित्र मंडळाच्या वतीने पुणे शहरात आज गोल्डन ज्युबली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शरद पवार आणि अजित पवार पक्षाचे आमदार चेतन तुपे एकाच व्यासपीठावर दिसले.
चेतन तुपे हे पुण्यातील हडपसरचे आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट (शरद पवार, अजित पवार) पडल्यानंतर आमदार तुपे यांनी अजित पवार यांच्यासोबत जाणे पसंत केले होते. मात्र, काही दिवसांपासून चेतन तुपे यांच्याकडून शरद पवार यांची मनधरणी केली जात असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. आज तुपे थेट शरद पवार यांच्याबरोबर मंचावर दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.
दरम्यान, कार्यक्रम संपल्यानंतर आमदार तुपे यांनी शरद पवार यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पवारांनी त्यांच्याकडे बघितलं सुद्धा नाही. कार्यक्रमानंतर आमदार चेतन तुपे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. हा कार्यक्रम राजकीय नव्हता. त्यामुळे प्रोटोकॉल म्हणून मी या कार्यक्रमात उपस्थित होतो. शरद पवारांसोबत कोणतीही चर्चा झाली नाही, असं आमदार तुपे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.