मालवण बंदरात २६ मे ते ३१ ऑगस्टपर्यंत जलपर्यटन पूर्ण बंद
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
बोटिंग, स्कूबा डायव्हिंगसह सर्व वॉटर स्पोर्ट्सवर बंदी
सिंधुदुर्ग पर्यटन व्यवसायावर तात्पुरता परिणाम अपेक्षित
पावसाळ्यातील धोकादायक समुद्रस्थितीमुळे खबरदारी
विनायक वंझारे, सिंधुदुर्ग
यंदाच्या पावसाळ्यात समुद्र किनाऱ्यावर वॉटर स्पोर्ट्सचा आनंद लुटण्यासाठी जात असाल तर थांबा, आधी ही बातमी वाचा. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवरील सुरक्षेला प्राधान्य देत महाराष्ट्र सागरी मंडळाने मालवण बंदर क्षेत्रात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. २६ मे २०२६ पासून ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत सर्व प्रकारची प्रवासी जलवाहतूक आणि वॉटर स्पोर्ट्स पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायावर तात्पुरता परिणाम होणार असला, तरी पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी ही उपाययोजना आवश्यक मानली जात आहे.
प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन एस. टी. उगालमुगले यांनी १३ मे २०२६ रोजी दिलेल्या पत्रानुसार हा बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. या आदेशानुसार सिंधुदुर्ग किल्ल्याकडे जाणारी प्रवासी वाहतूक, बोटिंग, स्कूबा डायव्हिंग तसेच विविध वॉटर स्पोर्ट्स पूर्णतः बंद राहणार आहेत. ‘इनलँड व्हेसल्स ॲक्ट, १९१७’ अंतर्गत नोंदणीकृत सर्व बोटी व जहाजांना मान्सून काळात आपले व्यावसायिक उपक्रम थांबवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
मालवण बंदर विभागाने या आदेशाची अंमलबजावणी सुरू केली असून, एकूण ३१ संस्था, पर्यटन सोसायट्या आणि वैयक्तिक बोट चालकांना याबाबत थेट सूचना देण्यात आल्या आहेत. यात सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशन, शिवशक्ती जलपर्यटन संस्था (चिवला), तारकर्ली, देवबाग, दांडी येथील बोटिंग संघटना तसेच स्थानिक स्कूबा डायव्हिंग व्यावसायिकांचा समावेश आहे.
दरवर्षीप्रमाणेच यंदाही पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो. उंच लाटा, जोरदार वारे आणि अनिश्चित हवामानामुळे जलपर्यटन धोकादायक ठरू शकते. अशा परिस्थितीत पर्यटकांच्या आणि स्थानिकांना धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून ही खबरदारी घेण्यात येते. मागील वर्षीही २० मेपासून पर्यटन हंगाम बंद करण्यात आला होता. यंदा २६ मेपासून अधिकृत बंदी लागू होत असून, प्रशासनाने नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.