विनोद जिरे/ सिद्धेश म्हात्रे / रणजित माजगावकर / गणेश कवडे, साम टीव्ही
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत असून, आज, राज्यात ठिकठिकाणी परस्परविरोधी गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, वाद, शाब्दिक चकमकी झडल्याचे चित्र होते. नाशिकमधील येवला, नांदगाव आणि मुंबईतील वरळीतील काही घटनांनंतर आता बीडच्या केज मतदारसंघ, ऐरोलीमधील कोपरखैरणे विभाग, मुंबईतील सायन कोळीवाडा, कोल्हापुरातील कसबा - बावडा परिसरात हाणामारी, शाब्दिक चकमक आणि वाद झाले. त्यामुळं ऐन थंडीत राजकीय आखाड्यातील पारा प्रचंड वाढल्याचे दिसून आले.
बीडच्या केज मतदारसंघातील विडा गावात मतदान केंद्राबाहेरच दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. त्यामुळं बराच वेळ तणाव निर्माण झाला होता. केंद्राबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मतदान करण्यावरून ही हाणामारी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट आणि भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये क्षुल्लक कारणावरून ही हाणामारी झाली. यानंतर काही काळ मतदान केंद्रावर तणाव होता. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानं वातावरण निवळलं. पण तणाव कायम असल्याचे दिसून आले. त्यामुळं पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला.
ऐरोली विधानसभा मतदारसंघातील कोपरखैरणे विभागात मोठा राडा झाला. स्वराज्य पक्षाचे उमेदवार अंकुश कदम यांनी भाजपचे माजी नगरसेवक शंकर मोरे यांच्या मुलाला मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे.
कोपरखैरणे येथील कार्यालयाबाहेर लागलेल्या बूथवर येऊन मारहाण करण्यात आली. तर शंकर मोरे यांच्या मुलाने कोपरखैरणे येथे स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप अंकुश कदम यांनी केला. कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी गेलो असता शंकर मोरे यांच्या मुलाने सुरुवातीला अंगावर हात उचलल्याने स्वरक्षणासाठी आम्ही देखील मारहाण केल्याचे अंकुश कदम यांनी सांगितले.
सायन कोळीवाडा मतदारसंघात पोलीस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झडली. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मतदारांवर प्रभाव टाकल्याचा आरोप भाजपने केला. तर पोलिसांकडून काँग्रेसला मदत होत असल्याचा आरोपही करण्यात आला. भाजप आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांनी याबाबत पोलिसांना जाब विचारला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.