Tigers in maharashtra: उत्तम अधिवास, विपुल शिकार आणि उपयुक्त जंगल यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या 200 वर गेली आहे. सह्याद्री वगळता राज्यात 390 ते 446 एवढी वाघांची संख्या झाली आहे. 2022 मध्ये केलेल्या व्याघ्र गणनेची आकडेवारी जाहीर झाली असून, यात ही वाढ दिसून आली आहे. (Latest Marathi News)
चंद्रपूर जिल्हा वाघांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी नेहमीच अग्रेसर राहिला आहे. त्यामुळेच जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प असो किंवा संरक्षित जंगल असो, वाघांची संख्या सतत वाढती राहिली आहे. ताडोबात आजघडीला 87, तर संरक्षित आणि प्रादेशिक जंगलात 120 वर वाघ आहेत. विशेष म्हणजे यात बछडे गृहीत धरले जात नाही.
जिल्ह्यात अशा बछड्यांची संख्या 60 वर आहे. म्हणजेच प्रौढ आणि बछड्यांची एकूण संख्या बघितली तर ती अडीचशेवर आहे. जिल्ह्यात ताडोबा खालोखाल ब्रम्हपुरी वन विभागात 53 वाघ आहेत. जिल्ह्यात सर्वत्र उत्तम जंगल असल्याने प्रत्येक भागात वाघांचे अस्तित्व ठळकपणे दिसून आले आहे. केवळ वाघच नाही, तर बिबट्यांच्या संख्येतही वाढ झालेली दिसून आली.
जिल्ह्यात बिबट्यांची संख्या 206 वर आहे. वाघांची वाढती संख्या लक्षात घेतली तर इथले जंगल त्यांना अपुरे पडू लागल्याचे दिसते. त्यामुळेच अनेक वाघांनी दुसऱ्या जागी स्थलांतर केले. अशा वाघांची नोंद इथे होऊ शकली नाही.
ताडोबा किंवा चंद्रपूर जंगलाला लागून इतर अनेक कॉरिडॉर आहेत. यात पेंच, नागझिरा, कान्हा, इंद्रावती, कावड यांचा समावेश आहे. या ठिकाणी इथल्या वाघांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यामुळे चंद्रपूर हे सोर्स पॉप्युलेशन एरिया ठरले आहे.
या जिल्ह्याला लागून असे कॉरिडॉर नसते, तर वाघांची संख्या इथे किती वाढली असती, याचा विचार न केलेलाच बरा. दरम्यान वाघांची संख्या उत्साह वाढवणारी असल्याने वन विभागावरील जबाबदारीही वाढली आहे. संवर्धन आणि संगोपन या दृष्टीने व्यापक उपाय करून, मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी आता प्रयत्न होणे गरजेचे आहे.
वाघांची आकडेवारी (2022 च्या गणनेनुसार)
ताडोबा - 87
ब्रम्हपुरी (चंद्रपूर) - 53
कऱ्हांडला (नागपूर) - 06
नागझिरा (भंडारा) - 12
पेंच (नागपूर) - 41
बोर (वर्धा) - 9
मेळघाट (अमरावती) - 55
टिपेश्वर (यवतमाळ) - 9
पांढरकवडा (यवतमाळ) - 12
पैनगंगा (यवतमाळ)- 2
मध्य चांदा - 12
भद्रावती (चंद्रपूर) - 13
राजुरा (चंद्रपूर) - 2
कन्हाळगाव (चंद्रपूर) - 12
जुनोना (चंद्रपूर) - 21
बावनथडी (भंडारा) - 13
गडचिरोली सर्कल - 27
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - 06
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.