पुण्यानंतर लातुरात दोघांची हत्या
शेतात झोपलेल्या बाप-लेकाची निर्घृण हत्या
हल्लेखोरांनी मध्यरात्री दोघांना संपवलं
संदिप भोसले, साम टीव्ही
पुण्यानंतर आता लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील रुद्धा गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. गावामधील शेतातील आखाड्यावर झोपलेल्या बाप-लेकाची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. शिवराज सुरनर (७०) आणि विश्वनाथ शिवराज सुरनर असे हत्या केलेल्या बाप-लेकाचे नाव आहे. ही घटना ३ नोव्हेंबर रोजी रात्री घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, रुद्धा गावात बाप-लेक ३ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास शेतातील आखाड्यावर झोपायला गेले होते. गाढ झोपेत असलेल्या दोघांवर मध्यरात्री जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला. हल्लेखोरांनी अतिशय क्रूरपणे दोघांच्याही चेहऱ्यावर, तोंडावर आणि गळ्यावर शस्त्राने वार करून ठार केले.
बाप-लेकाची हत्या केल्यानंतर त्यांचे मृतदेह शेतातून उचलले. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाच्या पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीजवळ फेकले. ही घटना सकाळी उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे.
दोघांची हत्या झाल्याची माहिती मिळताच लातूर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलीस अधीक्षक अमोल तांबे, पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले, पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक केदासे, माणिक डोके, पोलीस उपनिरीक्षक बुरकुले, स्मिता जाधव, आनंद श्रीमंगल, आणि अहमदपूर येथील डीडी पथक प्रमुख तानाजी आरदवाड आणि इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.
पोलिसांनी तपासाला गती देण्यासाठी फॉरेन्सिक लॅबची टीम, डॉग स्कॉड, फिंगरप्रिंट एक्सपर्ट आणि मोबाईल एक्सपर्ट व्हॅन यांना पाचारण करण्यात आलंय. त्यांच्याकडून पुरावे गोळा करण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे.
दोन्ही बाप-लेकाच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं आहे. त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या प्रकरणात अहमदपूर पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.