कोरेगाव विधानसभा:
नुकत्याच झालेल्या सातारा लोकसभा निवडणुकीत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी विजय मिळवत राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला जोरदार धक्का दिला.भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवत उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे यांचा पराभव करत गेलेली खासदारकी खेचून आणली. गेल्या पंचवार्षिकमध्ये विधानसभा त्यानंतर लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे शशिकांत शिंदे यांना दुहेरी झटका बसला आहे.
या दोन्ही पराभवाचा वचपा काढण्यासाठी त्यांना अवघ्या काही दिवसांवर आलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये घाम गाळावा लागणार आहे. मात्र कोरेगाव विधानसभेतून निवडणूक लढवणाऱ्या शशिकांत शिंदे यांच्यासमोर शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार महेश शिंदे यांचे मोठे आव्हान असेल, त्यामुळे येणारी विधानसभाही शशिकांत शिंदे यांच्यासाठी सोपी नसेल. कसं असेल कोरेगाव विधानसभेचे चित्र अन् राजकारण वाचा, वाचा सविस्तर.
कोरेगाव विधानसभा मतदारसंघ हा पहिल्यापासून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे हे सलग दोन वेळा आमदार राहिले आहेत. २००९ आणि २०१४ च्या निवडणुकीत शशिकांत शिंदे यांनी याठिकाणी बाजी मारली होती. २०१४ मध्ये शशिकांत शिंदे यांना 95,213 मते, काँग्रेसचे विजयराव कणसे यांना 47966 मते मिळाली होती. त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीत ते हॅट्रिक मारणार हे जवळपास निश्चित होते.
मात्र शिवसेनेकडून पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या महेश शिंदे यांनी त्यांचा पराभव करत जायंट किलरची भूमिका बजावली. या निवडणुकीत महेश शिंदे यांना 1 लाख 1 हजार 487 मतं मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना 95 हजार 205 मतं मिळाली होती. नवख्या उमेदवाराकडून झालेला पराभव हा राष्ट्रवादीसह शशिकांत शिंदे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात होता. त्यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही त्यांना पराभव स्विकारावा लागल्याने ही विधानसभेची निवडणूक त्यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई लढणार आहे.
गेल्या निवडणुकीत शिवसेनेसकडून निवडणूक लढवलेले महेश शिंदे हे सध्या शिंदे गटात आहेत तर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवलेले शशिकांत शिंदे हे सध्या शरद पवार यांच्यासोबत आहे. पक्षफुटीनंतर सातारा जिल्ह्यातील शिवसेनेत मोठे बदल झाले असले तरी महेश शिंदे यांनी वर्चस्व निर्माण केले आहे. कोरेगाव, पुसेगाव खटाव तसेच बुध भागात मोठ्या प्रमाणात युवकांमध्ये महेश शिंदे यांची क्रेझ आहे. तसेच एकनाथ शिंदे यांचे ते विश्वासू म्हणूनही ओळखले जातात. या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.
दुसरीकडे दोन वेळा आमदार राहिलेले शशिकांत शिंदे यांच्यामागेही राष्ट्रवादीचा परंपरागत मतदार आहे. शरद पवार यांचे विश्वासू म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. सत्तेत नसले तरी त्यांनी विकासकामांच्या माध्यमातून जनसंपर्क ठेवला आहे.तसेच मुंबईमधील मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान त्यांनी मुंबई बाजार समितीमध्ये मराठा बांधवांची केलेली सोय, मदत यामुळे मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेणारे नेते अशी प्रतिमा तयार झाली आहे.
ज्याचा शशिकांत शिंदे यांना मोठा फायदा होईल, अशी शक्यता आहे. थोडक्यात सध्या तरी दोन्ही उमेदवार तुल्यबळ असल्याचे दिसत आहे. परंतु, सध्या या दोन उमेदवारांमध्ये लढत होणार असल्याचे चित्र दिसत असले तरी मतदार संघांमधील बंडखोरी, कुरघोड्यांच्या राजकारणाला अखेरच्या टप्प्यात ऊत येईल. त्यामुळे अंतिम टप्प्यात चित्र आणखी बदलण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.