रणजीत माजगांवकर, साम टीव्ही
कोल्हापूरच्या महिला क्रिकेटपटू अनुजा पाटील आणि श्वेता माने यांची महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला टी-२० क्रिकेट संघात निवड झाली आहे. बीसीसीआयच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या टी-२० स्पर्धेसाठी या दोघींना महाराष्ट्राच्या संघात संधी मिळाली आहे. येत्या २६ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबरदरम्यान सुरत येथे ही स्पर्धा पार पडणार आहे. विशेष म्हणजे, अनुजा पाटील हिला भारतीय संघाकडून खेळण्याचा अनुभव असून, तिने यापूर्वी महाराष्ट्र संघाचे नेतृत्वही केले आहे.
बीसीसीआयच्या स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली असून, २६ ऑक्टोबरपासून सुरत येथे टी-२० सामन्यांचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ एलिट ‘ब’ गटात असून, आसाम, कर्नाटक, चंदीगड, छत्तीसगड, बंगाल, जम्मू-काश्मीर आणि गोवा या संघांशी महाराष्ट्राची लढत होणार आहे. अनुजा पाटील हिचा क्रिकेटमधील अनुभव विशेष उल्लेखनीय आहे. २०१३-१४ मध्ये तिची भारतीय संघासाठी निवड झाली होती. भारतीय संघाकडून टी-२०, आशिया कप आणि चॅलेंजर ट्रॉफी स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी तिला मिळाली. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका दौऱ्यांमध्येही तिने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील संघात चार वर्षे, तर वरिष्ठ महिला संघात सहा वर्षे खेळताना अनुजाने दोन वेळा कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली. महिला महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्येही ती गेल्या तीन वर्षांपासून खेळत आहे. मागील वर्षी पुणेरी वॉरियर्स संघाचे नेतृत्व करताना तिने संघाला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
दुसरीकडे, श्वेता माने गेल्या आठ वर्षांपासून महाराष्ट्र महिला संघाचे, तर पाच वर्षांपासून रेल्वे महिला संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. पश्चिम विभागीय संघातूनही ती खेळली असून, महिला महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये पुणेरी वॉरियर्स संघाकडून ती मैदानात उतरते. अनुजा आणि श्वेता यांच्या निवडीमुळे कोल्हापूरच्या महिला क्रिकेटची राष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा दखल घेतली गेली आहे. आता सुरतमधील स्पर्धेत या दोन्ही खेळाडूंच्या कामगिरीकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.