रणजित माजगावकर, कोल्हापूर|ता. २५ जुलै २०२४
गेल्या २४ तासांपासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे कोल्हापुर शहरावर पुराचे संकट कोसळण्याची शक्यता असून प्रशासनाकडून संपूर्ण जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
गेल्या २४ तासांपासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे पंचगंगा नदीने आता धोक्याची पातळी ओलांडली असून सध्याची पातळी ४३.१ फुटांवर पोहोचली आहे. जिल्ह्यातील ८३ बंधारे पाण्याखाली असून धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच आहे. पावसामुळे कोल्हापूर रत्नागिरी या राज्य मार्गावर पाणी आले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने काल रात्री कोल्हापूर रत्नागिरी मार्ग पंचगंगा नदी परिसरामध्ये बंद केलेला आहे.
राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे धारणातील विसर्ग १५०० क्युसेकवरुन वाढ होऊन एकूण ५८०० cusec इतका विसर्ग भोगावती नदी पात्रात होण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.
दरम्यान, पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून शहरावर पुराचे संकट ओढावण्याची भिती आहे. 2019 आणि 2021मधील नुकसान पाहता या पुराचा कोल्हापूरकरांनी धसका घेतला असून पुराच्या पाण्यात आपल्या चार चाकी वाहनांचे नुकसान होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. न्यू पॅलेस महावीर कॉलेज परिसरातील नागरिकांनी आपली चार चाकी वाहने उंचावर नेऊन लावण्यात आली आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.