पुणे शहरासह परिसरात बुधवारी रात्री अतिमुसळधार पाऊस झाला. पावसामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. खडकवासला धरण काठोकाठ भरले असून धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
खडकवासला धरणातून गुरुवारी पहाटे ३ वाजेपासून २२ हजार ८८० क्यूसेक विसर्ग होत आहे. पावसाची संततधार (Pune Rain Alert) लक्षात घेता सकाळी ६ वाजेपासून ४० हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे. धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणानुसार विसर्ग कमी/जास्त होऊ शकतो. नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असं आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या (IMD Rain News) माहितीनुसार, येत्या काही तासात पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर आणि पुणे शहरातील शाळा २५ जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील शाळा देखील बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. खडकवासला धरणातून ४० हजार क्यूसेक विसर्ग सुरू होत आहे. तसेच पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी केले आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. खडकवासला धरण काठोकाठ भरलं आहे. वरसगाव धरणात जवळपास ६० टक्के पाणीसाठा जमा झालाय. तर पाणशेत धरणही ७० टक्क्यांहून अधिक भरलंय. टेमघर धरणातील पाणी साठा १.९४ टीएमसी म्हणजे ५३.५० टक्के इतका झाला आहे. या साठ्यामुळे पुणे शहरातील नागरिकांची दीड महिन्याची तहान भागणार आहे. गेल्या बारा तासांत या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ७५ मीमी इतका पाऊस झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.