- सुशिल थाेरात
दुधाला किमान 40 रुपये भाव मिळावा या मागणीसाठी राज्यभर दुध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत. वर्षभर सातत्याने तोटा सहन करावा लागल्याने दुध उत्पादकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून राज्यात शेतकरी आंदाेलन करु लागला आहे. सरकारने सर्व आंदोलनांची दखल घेत दुध उत्पादकांच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी किसान सभेचे डाॅ. अजित नवले यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी हा विषय गांभीर्याने घ्यावे अन्यथा येत्या 28 जून पासून राज्यात किसान सभा व समविचारी विविध शेतकरी संघटना, कार्यकर्ते व आंदोलकांमध्ये समन्वय स्थापित करून तीव्र आंदाेलन छेडेल असा इशारा किसान सभेचे डाॅ. अजित नवले यांनी दिला आहे.
डाॅ. अजित नवले म्हणाले गेले वर्षभर दुध दराबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीची भावना आहे. प्रति लिटर 10 ते 15 रुपयांचा तोटा सहन करून दुध उत्पादक शेतकरी दुध घालत आहेत. दुध उत्पादनातील वाढता तोटा सहनशक्तीच्या पलीकडे गेला आहे. राज्य सरकारने ही परिस्थिती लक्षात घेऊन नागपूर अधिवेशनात जाहीर केल्याप्रमाणे दुधाला किमान 35 रुपये दर द्यावा, बंद केलेले दुध अनुदान पुन्हा सुरु करावे, वाढता उत्पादनखर्च व तोटा पाहता अनुदानात वाढ करून ते प्रति लिटर 10 रुपये करावे तसेच अनुदान बंद काळात दुध घातलेल्या शेतकऱ्यांना या काळातील अनुदान द्यावे या मागण्या दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने केल्या आहेत.
डाॅ. नवले पुढं बाेलताना म्हणाले दुधाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी तत्कालीन उपाय योजनांच्या बरोबरच दीर्घकालीन दुध धोरण तयार करण्याची नितांत आवश्यकता आहे. दुधाला उत्पादन खर्चावर आधारित योग्य भाव मिळावा यासाठी उसाप्रमाणे दुधालाही एफ.आर.पी. व रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू करावे, दुग्ध मूल्य आयोगाची स्थापना करावी, पशुखाद्य व पशु औषधांचे दर नियंत्रित करावेत, खाजगी व सहकारी दुध संघाना लागू होईल असा लुटमार विरोधी कायदा करावा.
दुध भेसळ रोखावी, अनिष्ट ब्रँडवार रोखण्यासाठी एक राज्य एक ब्रँड धोरणाचा स्वीकार करावा, मिल्कोमीटर व वजन काट्यात होणारी दुध उत्पादकांची लुटमार थांबविण्यासाठी तालुका निहाय स्वतंत्र तपासणी निरीक्षकांची नियुक्ती करावी, शासकीय अनुदानातून पशु आरोग्य विमा योजना सुरु करावी या मागण्या संघर्ष समिती करत आहे.
28 जून पासून राज्यभर आंदाेलन
राज्य सरकारने दुध उत्पादकांच्या या मागण्यांची तातडीने दखल घ्यावी असे आवाहन करण्यात करत नवलेंनी 28 जून पासून सुरु होणाऱ्या या आंदोलनाची व्याप्ती राज्यभर विस्तारणार असल्याचे नमूद केले. राज्य सरकारने या पार्श्वभूमीवर दुध उत्पादकांचा अधिक अंत पाहू नये असे आवाहन देखील डाॅ. नवले यांनी केले आहे.
शासनाला दिलेल्या निवेदनावर डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले, उमेश देशमुख, सतीश देशमुख, अशोकराव ढगे, जोतीराम जाधव, नंदू रोकडे, दादा गाढवे, राजकुमार झोरी, श्रीकांत कारे, रामनाथ वदक, दीपक वाळे, मंगेश कान्होरे, दीपक पानसरें, सुहास रंधे, अमोल गोर्डे, रवी हासे, दीपक काटे, केशव जंगले यांच्या स्वाक्ष-या आहेत.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.