आज एका महत्त्वाच्या विषयावर खासदारांशी चर्चा करणे आवश्यक आहे, म्हणूनच या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीबाबतचा निरोप प्रत्येक खासदारापर्यंत पोहोचवण्यात आला असून त्यांच्या घरी, ईमेलवर आणि व्हॉट्सॲपवर (WhatsApp) देखील पाठवला आहे. तसेच अनेकांशी प्रत्यक्ष फोनवरूनही संपर्क साधण्यात आल्याची माहिती यावेळी संजय राऊतांनी दिली. ठाकरे गटाकडून खासदारांना कडक व्हीप बजावण्यात आला असून बैठकीला उपस्थित राहण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत.
प्रसारमाध्यमांवर जे वातावरण दाखवले जात आहे, ते पाहता आमचे नऊ किंवा १५ खासदार बैठकीला उपस्थित राहतील. संसद कार्यालयात जे आमचे कामकाज आहे, ते पूर्ण करून ही बैठक पार पडेल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाही फोन आला होता, त्यांनी माहिती घेतली आणि काही सूचनाही केल्या आहेत. ही एक नियमित प्रक्रिया असून यात काही नवीन नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
आमदार-खासदार फोडण्याच्या चर्चांवर उत्तर
विरोधकांकडून आमदार फोडण्याचे प्रयत्न होत असल्याच्या प्रश्नावर राऊत आक्रमक झाले. "त्यांना वाटते की त्यांनी एकदा हे केले म्हणजे ते पुन्हा करू शकतात. मी आव्हान देतो की आता फोडून दाखवा." असे संजय राऊत म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात जाऊन मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतात, पण देशात काय सुरू आहे ते त्यांनी आधी पाहावे, अशी टीकाही यावेळी त्यांनी केली.
आमच्या बापाचे नाव बाळासाहेब ठाकरे आहे. लोकशाहीचा काय खेळ लावून ठेवला आहे? पैशांची इतकी मस्ती आली आहे का? ईडी (ED) आणि सीबीआयची (CBI) धमकी कोणाला देता? आम्ही जेलमध्ये जाऊन आलो आहोत आणि पुन्हा जाण्यास तयार आहोत, पण तुम्हाला धडा शिकवूनच जेलमध्ये जाऊ, असे संजय राऊत म्हणाले. देशाची प्रतिष्ठा, लोकशाही आणि संविधानासोबत खेळ खेळला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. उद्धव ठाकरे आणि पक्षाचे कार्यकर्ते मेहनत करून लोकांना निवडून आणतात आणि दुसरीकडे लोकप्रतिनिधींना किडनॅप किंवा हायजॅक केले जाते, ही कसली लोकशाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्राच्या राजकारणाची 'गोलपिठा'शी तुलना
संजय राऊत यांनी आचार्य दादा धर्माधिकारी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विधानांचा संदर्भ देत सध्याच्या राजकारणावर अत्यंत तीव्र शब्दांत टीका केली. ते म्हणाले की, "पैशांचे राज्य हे वेश्यांचे राज्य असते" हे आचार्य धर्माधिकारींचे वाक्य आहे आणि बाळासाहेबांनीही सध्याच्या राजकारणापेक्षा वेश्या अधिक प्रामाणिक असतात असे म्हटले होते.
राऊत यांनी आरोप केला की, आज महाराष्ट्राचा आणि देशाच्या राजकारणाचा 'गोलपिठा' (वेश्यावस्ती) बनवला गेला असून याचे केंद्र महाराष्ट्र आहे. आमदार आणि खासदार एका पक्षाच्या तिकिटावर निवडून येतात आणि पैशांचे प्रलोभन दाखवल्यावर तात्काळ पक्षांतर करतात. राऊतांनी शिंदे गटातील लोकांचा उल्लेख 'गोलपिठातले दलाल' असा केला आणि हे दलाल निर्माण करण्याचे काम भाजपने (BJP) केले असून, त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासला आहे, अशी घणाघाती टीका केली.
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा व आंदोलनाचा इशारा
संजय राऊत यांनी सांगितले की, नुकतीच त्यांची उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचाही फोन आला होता. शरद पवार यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे की, "आता जर कोणी अशा प्रकारे बेईमानी करणार असेल, तर त्यांना सोडायचे नाही. त्यांच्या मतदारसंघात जाऊन थेट जाहीर सभा आणि आंदोलने (राडे) करायची. जर कोणताही खासदार फुटला, तर त्याला मोकळीक द्यायची नाही आणि धडा शिकवायचा" या लढ्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष एकत्रितपणे मैदानात उतरतील, असा इशाराही राऊत यांनी शेवटी दिला.
संजय राऊत यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या वक्तव्याची आणि विचारांची आठवण करून दिली. ते म्हणाले की, बाळासाहेबांनी जाहीरपणे सांगितले होते की, "यापुढे एखादा खासदार किंवा आमदार फुटला, तर त्याला रस्त्यात तुडवा, कायद्याची परवा करू नका." हाच बाळासाहेबांचा खरा आदेश आणि विचार आहे.
गट स्थापनेच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह
राऊत यांनी स्पष्ट केले की, आम्ही आमचा व्हीप (Whip) जाहीर केला आहे आणि लोकसभेच्या अध्यक्षांना दिलेले पत्रही मीडियाला दाखवले आहे. जर दुसऱ्या बाजूने नवा गट स्थापन केल्याचा दावा केला जात असेल, तर त्यांनीही त्याचे अधिकृत पत्र आणि खासदारांचे फोटो जाहीर करून दाखवा. सकाळी ११ वाजता संसदेच्या कार्यालयात ही महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीनंतर पुढील सर्व चित्रांवर अधिकृतपणे बोलता येईल, असे सांगत त्यांनी पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या आदेशाचा पुनरुच्चार केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.