७७ वर्षीय आजीबाईंनी मिळवला नगरपंचायतीच्या निवडणुकीत विजय
अनवाणी पायाने केला होता प्रचार
वयाचे बंधन न जुगारता आजीबाईंनी मिळवला ऐतिहासिक विजय
संजय जाधव, जळगाव, साम टीव्ही प्रतिनिधी
काल नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणूकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणूकीत एका ७७ वर्षांच्या आजीबाईंनी विजय मिळवला आहे. कोणत्याही वयात तुम्ही काहीही करु शकतात, याचे या आजी उत्तम उदाहरण आहे. भाजपच्या जनाबाई रंधे यांचा नशिराबादमध्ये प्रभाग ७ (अ) मधून दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी पायात चप्पल न घालता प्रचार केला होता.
राजकारणात वयाचा बाऊ केला जात असतानाच, जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद नगरपंचायतीच्या निवडणुकीत एक विलक्षण आणि प्रेरणादायी निकाल समोर आला आहे. वयाच्या ७७ व्या वर्षी, पायात साधी चप्पलही न घालता, कडक उन्हातान्हात प्रचार करणाऱ्या जनाबाई रंधे यांनी नगरसेवक पदी विजय मिळवला आहे. भारतीय जनता पक्षातर्फे (BJP) प्रभाग क्रमांक ७ (अ) मधून त्या विजयी झाल्या असून, त्यांच्या या 'साधेपणाचा' विजय संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
प्रचार ते विजय: ७७ वर्षीय आजीबाईंचा अनवाणी प्रवास
आजच्या हायटेक प्रचार यंत्रणेच्या काळात जनाबाईंचा प्रचार मात्र अत्यंत जमिनीवरचा राहिला. विशेष म्हणजे, जनाबाई रंधे या आजही पायात चप्पल घालत नाहीत. निवडणुकीच्या काळात उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते मतदानाच्या दिवसापर्यंत, त्यांनी अनवाणी पायानेच संपूर्ण प्रभाग पिंजून काढला. 'गावातील रस्ते आणि तिथली माणसं माझीच आहेत, तिथे चप्पल कशाला हवी?' अशी त्यांची साधी भावना मतदारांना भावली. आजही त्या गावात अनवाणीच फिरताना दिसतात.
नशिराबाद शहराला राजकीय आणि सामाजिक वारसा आहे. अशा परिस्थितीत मतदारांनी तरुण रक्तासोबतच ज्येष्ठत्वाच्या अनुभवावरही विश्वास दाखवला आहे. प्रभाग क्रमांक ७ (अ) मधील मतदारांनी जनाबाईंच्या पारड्यात भरभरून मते टाकून त्यांच्या जनसंपर्कावर शिक्कामोर्तब केले आहे. वयाच्या ७७ व्या वर्षी जिथे अनेकजण निवृत्तीचा मार्ग स्वीकारतात, तिथे जनाबाईंनी लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी स्वीकारून तरुणांसमोरही एक आदर्श ठेवला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.