सर्वत्र दिवाळीचा उत्साह सुरू झालाय. आज धनत्रयोदशी आहे, धनत्रयोदशीच्या दिवशी थोडेफार का होईना सोने खरेदी करून त्याचे घरात पूजन केले तर घरामध्ये बरकत असते अशी नागरिकांची भावना आहे. याच भावनेतून आज धनत्रयोदशी दिवशी देशातली सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावच्या सराफ बाजारात सोने खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळालं आहे.
सकाळपासूनच आज सराफ बाजारात ग्राहकांची गर्दी दिसून आली. ग्राहकांच्या गर्दीमुळे सुवर्णनगरी आज चांगलीच गजबजल्याचं पाहायला मिळालं. गेल्या वर्षी सोन्याचे भाव हे 60 हजार रुपयांपर्यंत होते हेच भाव आता यावर्षी 81 हजार 600 रूपयांवर पोहोचले आहेत.
तर चांदीचा भाव 1 लाख 1500 रूपये असून आज मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांनी सराफ बाजारात गर्दी केल्याचे दिसून आलं. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सराफ व्यावसायिकांकडून ग्राहकांसाठी वेगवेगळ्या आकर्षक डिझाईनमध्ये सोन्याचे दागिने उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच लक्ष्मीपूजन लक्षात घेता चांदीची लक्ष्मी, चांदीच्या लक्ष्मीचे शिक्के सुद्धा उपलब्ध करून देण्यात आले असून हे खरेदी करण्याकडेही ग्राहकांचा मोठा कल दिसून येत आहे.
गेल्या वर्षापेक्षा दरवाढ झाल्याने गृहिणींचं बजेट कोलमडले आहे. मात्र थोडेफार का होईना सोने खरेदी करण्यासाठी महिला ग्राहकांनी सोन्याच्या दुकानात मोठे गर्दी केल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. काही दिवसांनी लग्नसराई सुद्धा आहे त्यामुळे लग्नसराईसाठीचं सोनं सुद्धा नागरिक आजच खरेदी करताना दिसून येत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.