म्हाडा कोकण मंडळाच्या घरांच्या सोडतीसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज येतायत. ठाणे, वसई, कल्याण आणि नवी मुंबई या ठिकाणांतील ५,२८५ घरांसाठी आतापर्यंत तब्बल एक लाखांहून अधिक अर्ज भरले गेले आहेत. अजून नऊ दिवस अर्ज भरण्याची मुदत शिल्लक असल्याने अर्जदारांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, यावेळी पहिल्यांदाच मुंबई मंडळाइतकीच मागणी कोकण मंडळाच्या घरांसाठी दिसत आहे.
या सोडतीत वेगवेगळ्या योजनांअंतर्गत घरे उपलब्ध आहेत. त्यात २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत ५६५ घरे, १५ टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेअंतर्गत ३,००२ घरं, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना आणि विखुरलेल्या स्वरूपातील १,६७७ घरं आणि ५० टक्के योजनेअंतर्गत ४१ घरं विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत.
ठाणे, डोंबिवली, कल्याण, टिटवाळा आणि नवी मुंबईसारख्या ठिकाणी ही घरे उपलब्ध असून त्यांची किंमत ९.५० लाखांपासून ते ८५ लाख रुपयांपर्यंत आहे. मंगळवार रात्री १० वाजेपर्यंत १ लाख ५७९ जणांनी अर्ज भरले तर त्यापैकी ६७ हजार ६४८ जणांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केले आहेत.
घरांसाठी इच्छुक अर्जदारांना २८ ऑगस्ट रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://housing.mhada.gov.in) ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. त्यानंतर २९ ऑगस्ट रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अनामत रकमेचा भरणा करता येईल.
अनामत रकमेसह भरलेल्या अर्जांची सोडत १८ सप्टेंबर रोजी ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात काढण्यात येणार आहे, अशी माहिती कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.