नाशिकमधील बहुचर्चित हनी ट्रॅप प्रकरणात ७२ अधिकारी अन् नेते अडकल्याची चर्चा सुरू असताना या प्रकरणाची पाळमुळं आता जळगावपर्यंत पोहोचल्याची माहिती आहे. या प्रकरणात जळगावच्या जामनेर येथील प्रफुल्ल लोढा याच्या विरोधात मुंबईत पोक्सो अंतर्गत आणि हनी ट्रॅप प्रकरणात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी लोढा यास अटक केली असून, त्याच्या मालमत्तेची तपासणी, लॅपटॉप, पेन ड्राईव्ह आणि इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस जप्त केल्या आहेत.
प्रफुल्ल लोढा (वय वर्ष ६२) हे जळगावच्या जामनेर तालुक्यातील पहूर येथील रहिवासी आहेत. लोढा यानं नोकरीची भूलथाप देत अल्पवयीन मुलींवर अत्याचार केला. तसेच अश्लील फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली. नंतर मुलींना डांबूनही ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
गंभीर आरोपावरून साकीनाका पोलीस स्टेशन आणि अंधेरी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये पोक्सो, बलात्कार, खंडणी आणि हनी ट्रॅपचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी प्रफुल्ल लोढा याला बेड्या ठोकल्या आहेत. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर नाशिकमधील बहुचर्चित हनी ट्रॅप प्रकरणाची पाळंमुळं जळगावपर्यंत पोहोचली असल्याचं म्हटलं जात आहे.
नेमकं प्रकरण काय?
कथित समाजसेवक म्हणून वावरणाऱ्या प्रफुल्ल लोढा याचे मुंबईतील चकाला परिसरात चकाला हाऊस नावाचा बंगला आहे. त्या ठिकाणी नोकरीचे आमिष दाखवून त्यानं १६ वर्षीय मुलीसह तिच्या मैत्रिणीवर अत्याचार केला. अत्याचार केल्यानंतर त्यांचे अश्लील फोटो काढले. तसेच व्हायरल करण्याची धमकी दिली.
धमकी दिल्यानंतर त्यानं मुलींना डांबून ठेवलं. या प्रकरणाची माहिती मिळताच ३ जुलै रोजी साकिनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ५ जुलै रोजी पोलिसांनी प्रफुल्ल लोढाला अटक केली. तर, १४ जुलै रोजी लोढाविरोधात अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोक्सो, बलात्कार आणि हनी ट्रॅपचा गु्न्हा दाखल करण्यात आला.
प्रफुल्ल लोढा नेमके कोण?
प्रफुल्ल लोढा हा एकेकाळी जळगाव जिल्ह्यातील एका मातब्बर नेत्याचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जायचा. २०२४मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान, लोढाला वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, अवघ्या पाच दिवसांत त्यानं ही उमेदवारी मागे घेतली. यानंतर अचानकपणे त्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. विशेष म्हणजे, ज्यांच्यावर तो पूर्वी टीका करत होता, अशा गिरीश महाजन यांचे तो आता कट्टर समर्थक म्हणून पुढे आला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.