सोलापूरमध्ये अतिवृष्टीने ४८९ गावे बाधित झाली आहेत
अक्कलकोट तालुक्यात वाहतूक ठप्प झाली असून कर्नाटक व मराठवाड्याशी संपर्क तुटला
शेतकऱ्यांचे पिके पाण्याखाली गेली आहेत.
धाराशिव जिल्ह्यातही अतिवृष्टी झाली असून पंचनाम्यासह तात्काळ मदतीची मागणी
राज्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला असून सोलापूरमध्ये गेल्या ८ ते १० दिवसांत पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील नदी, नाले, ओढे ओसंडून वाहत आहेत. सोलापूरमधील सीनानदीने रौद्र रूप धारण केले आहे. त्यामुळे नदी काठची शेती पाण्याखाली जाऊन उध्वस्त झाली आहे. या पावसामुळे बळीराजावर ओल्या दुष्काळाचे संकट ओढवले आहे.
जिल्ह्यातील ११० महसुली सर्कलपैकी तब्बल ४० सर्कलमधील ४८९ गावे अतिवृष्टीने बाधित झाली असून शेतकरी राजा चिंतेत आला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सीना आणि भीमा या प्रमुख नद्यांनी पाणी पातळी ओलांडल्याने शेतकरी वर्गाचे कापूस, ज्वारी, मका, डाळी तसेच हंगामी भाजीपाला यासह मोठ्या प्रमाणावरचे पीक वाहून गेले असून शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. या सर्व गोष्टींचे पंचनामे सरकारने करावे आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
विशेषतः अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पावसाने भीषण परिस्थिती निर्माण केली आहे. मुसळधार पावसामुळे ओढे, नाले आणि स्थानिक नदीकाठावर पाण्याचा प्रचंड प्रवाह उसळला आहे. बोरगाव देशमुख – घोळसगाव पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. अनेक पूल आणि बंधारे ओव्हरफ्लो झाल्याने तालुक्यातील रस्ते वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी, अक्कलकोटचा मराठवाडा आणि शेजारील कर्नाटक राज्याशी संपर्क तुटला आहे.
या पुरसदृश परिस्थितीमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. ग्रामीण भागातील शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही याचा फटका बसला असून वैद्यकीय सेवेतही अडचणी निर्माण होत आहे. गावातील स्मशान भूमी देखील पाण्याखाली गेली असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याने सामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
धाराशिवमध्ये देखील परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. धाराशिवमध्ये परंडा तालुक्यातील कांदलगाव परिसरात अतिवृष्टी झाल्यामुळे शेती पिकांचे कांदा सोयाबीन तूर ऊस या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.गावापासून पर्जन्यमाप केंद्र दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर असल्यामुळे अतिवृष्टी बाधित गावात नोंदही झाली नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्याने याबाबत संताप व्यक्त केला आहे. त्वरित ओला दुष्काळ जाहीर करून मदत करावी अशी मागणी ही शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.