अकोला : राज्याच्या राजकारणात भूकंप आणणाऱ्या एकनाथ शिंदे गटाने शिवसेना पक्षप्रमुख (uddhav Thackeray) उद्धव ठाकरे यांना मोठा हादरा दिला आह. शिंदे गटाने (bjp) भाजपच्या सहकार्याने राज्यात सत्तांतर केलं आणि राज्याच्या राजकारणाला नवीन कलाटणी लागली. त्यानंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) अॅक्टिव्ह मोडमध्ये असल्याचे चित्र राजकीय मैदानात निर्माण झाले आहे. कारण, मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर, पालघर, रत्तागिरी, बदलापूर, लातूर अशा विविध जिल्ह्यातील आजी-माजी नगरसेवक एकनाथ शिंदे गटात सामील होत आहेत. इतकच नव्हे तर शिवसेनेचे आमदार विप्लव बाजोरीया (Viplav Bajoria) आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया (Gopikishan Bajoria) शिंदे गटात सामील झाले असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले आहे. तसेच युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल सरप, आश्विन नवले, शशी चोपडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला असल्याचेही समजते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार विप्लव बाजोरिया आज शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यांच्यासोबत युवासेनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल सरप,आश्विन नवले, शशी चोपडे यांच्यासह आदी कार्यकर्ते शिंदे गटात जाणार असल्याचे समजते. दरम्यान, विप्लव बाजोरिया हे शिवसेनेचे आमदार आहेत. माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचे ते पुत्र आहेत. दरम्यान, उद्या दुपारी त्यांच्याबरोबर शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांच्यासह काही कार्यकर्ते शिंदे गटात सामील होणार असल्याचेही कळते आहे. या संदर्भात उद्या अकोल्यात शिवसेनेची बैठक होणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
अकोल्यात शिवसेनेतील वाद 'या' कारणामुळे चव्हाट्यावर
शिवसेनेचे अकोल्याचे माजी जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांनी अनेकदा शिवसेना जिल्हाप्रमुख तथा बाळापुर मतदारसंघाचे आमदार नितिन देशमुख यांच्यावर आरोप केले होते. अकोल्यात शिवसेना संपवण्यासाठी देशमुख हे भाजपला नेहमी मदत करतात. याबाबत अनेक तक्रारीही पक्ष प्रमुखांकडे केल्या होत्या. मात्र त्यावर अद्याप तोडगा निघाला नसल्याचे त्यांनी म्हटलं होतं. अकोला शिवसेनेतील वादाला विधान परिषद निवडणुकीतील पक्षाच्या दारुण पराभवाची किनार आहे.
आमदार नितीन देशमुखांच्या दगाफटक्यांनीच तीनदा आमदार राहिलेल्या गोपीकिशन बाजोरिया यांचा पराभव झाला, असा आरोप बाजोरिया गटाने केला होता. माजी सहसंपर्कप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांनी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना पत्र दिलं होतं. या पत्रात आमदार आणि माजी जिल्हाप्रमुख नितीन देशमुखांवर गंभीर आरोप करण्यात आले होते. पत्रात पिंजरकरांनी आमदार देशमुखांवर गंभीर आरोप केले होते.
मात्र,आमदार नितीन देशमुखांनी सहसंपर्क प्रमुखांच्या आरोपांचं खंडन केलं होतं. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने अकोला जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर झाल्या. विशेष म्हणजे थेट शिवसेना पक्षप्रमुखांना पत्र लिहून आमदार नितीन देशमुखांवर गंभीर आरोप करणारे श्रीरंग पिंजरकर यांना सहसंपर्क प्रमुख पदावरून हटवले होते. या कारणामुळेच बाजोरिया गटांमध्ये पक्ष प्रमुख ठाकरेंवर नाराजी असल्याचे बोलले जात आहे.
Edited By - Naresh shende
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.