एकनाथ शिंदे आणि शिवसेना खासदारांनी दिल्लीत घेतली अमित शहांची भेट
अमित शाह यांच्यासोबत ५० मिनिटं चर्चा
बैठकीत विकासकामांसाठी निधी, प्रलंबित प्रकल्प आणि केंद्राच्या सहकार्यावर चर्चा
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आणि लोकसभेतील पक्षीय घडामोडींवरही चर्चा झाल्याची माहिती समोर
दिल्लीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह बंडखोर खासदारांनी मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान सर्व नेत्यांमध्ये महत्वाची बैठक पार पडली. तब्बल ५० मिनिटं ही बैठक सुरु होती. या भेटीदरम्यान, शिंदेसेनेत आलेल्या या सहाही खासदारांच्या आपापल्या मतदारसंघांतील प्रलंबित विकासकामांना गती देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. तसंच, या बैठकीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार, लोकसभेतील खासदारांचे विलीनीकरण आणि शिंदेसेनेच्या राजकीय सहभागाबद्दल देखील चर्चा झाली असल्याचे सांगितले जात आहे.
शिवसेना ठाकरे गटातून शिंदेसेनेत प्रवेश केलेल्या ६ बंडखोर खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी अमित शहा यांची भेट घेतली. नवी दिल्लीत ही सदिच्छा भेट घेण्यात आली. अमित शहा यांनी सर्व खासदारांचे स्वागत केले. या भेटीदरम्यान सर्व नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेचे गटनेते खासदार श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित होते. केंद्राच्या अखत्यारीत असणारे विविध प्रकल्प, आवश्यक निधी आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळावी, अशी मागणी या वेळी खासदारांच्या वतीने अमित शहा यांच्याकडे करण्यात आली होती. सहाही खासदारांच्या मतदारसंघातील लोककल्याणकारी योजना आणि विकास कामांसाठी केंद्र सरकारकडून निधी किंवा इतर कोणत्याही बाबींची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही अमित शाहांनी या खासदारांना दिली.
केंद्र सरकारमध्ये संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार आणि लोकसभेत शिंदेसेनेची वाढलीली ताकद या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी खासदारांसह अमित शहा यांची भेट घेतली असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हे देखील अमित शहा यांच्या भेटीसाठी पोहचले होते. दिल्लीमध्ये एकाच दिवशी या सर्व घडामोडी घडल्या त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. या बैठकीत केंद्रीय मंत्रीमंडळात शिवसेनेची भागीदारी, खासदाराचा अधिकृत पक्षप्रवेश आणि मान्सून अधिवेशन सत्राच्या आधीची रणनिती कशी असेल या सर्व मुद्यावर चर्चा झाली असल्याचे देखील म्हटले जात आहे.
आगामी पावसाळी अधिवेशनाच्या आधी एकनाथ शिंदे यांच्या या दौऱ्याचा एक प्रमुख उद्देश कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे हा आहे. लोकसभा सचिवालय लवकरच सर्व सहा नवनिर्वाचित खासदारांच्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील औपचारिक विलीनीकरणाची अधिकृत घोषणा करेल. यामुळे संसदेत शिंदेसेना या पक्षाचे स्थान आणखी मजबूत होईल. तसंच, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्ताराबाबतही मोठी उत्सुकता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेला केंद्र सरकारमध्ये दोन महत्त्वाची पदे मिळण्याची दाट शक्यता आहे. एक कॅबिनेट मंत्रीपद आणि दुसरं राज्यमंत्री पद मिळू शकेत. कॅबिनेट मंत्रिपद हे महत्त्वाचे पद खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे सोपवले जाऊ शकते अशी चर्चा होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.