मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा ‘विकसित भारत’ संकल्पनेला बळ देणारा असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला केंद्रीय करांमधील वाट्यापोटी 98,306 कोटी रुपये मिळणार असून विविध प्रकल्पांसाठी आणखी 12,355 कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूण मिळून महाराष्ट्राला सुमारे 1 लाख कोटींचा निधी प्राप्त होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आज सादर केलेल्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस माध्यमांशी बोलत होते. त्यांनी सांगितले की, या अर्थसंकल्पात शहरीकरणाचे नियोजनबद्ध धोरण, उद्योग आणि उद्योजकतेला चालना, गुंतवणूक वाढ आणि रोजगारनिर्मितीसाठी ठोस उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी केंद्र सरकारने 12 लाख कोटींची गुंतवणूक प्रस्तावित केली असून, पूर्वी हा आकडा केवळ 1 लाख कोटींच्या आसपास होता.
पाच लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांचा विचार करून एकात्मिक शहरी विकासाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. याचा मोठा फायदा महाराष्ट्राला होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. शेती, पशुपालन, मत्स्यव्यवसाय आणि सिंचन क्षेत्रासाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत.
महिलांसाठी ‘लखपती दिदी’ योजनेच्या यशानंतर स्वतंत्र महिला मॉल्स आणि उद्योग संधी निर्माण करण्याचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी वसतिगृहांची योजना राबवली जाणार आहे. जिल्हा रुग्णालयांमध्ये आपत्कालीन उपचार सुविधा उभारण्याचा निर्णय आरोग्य क्षेत्रासाठी मोलाचा ठरेल, असेही फडणवीस यांनी नमूद केले.
मुंबई-पुणे आणि पुणे-हैदराबाद हायस्पीड कॉरिडॉरमुळे राज्याच्या जीडीपीमध्ये लक्षणीय वाढ होणार असून, विशेषतः मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला मोठा लाभ होईल. तसेच मुंबई महानगर क्षेत्र (MMR), पुणे आणि नागपूर येथे ग्रोथ हब्ससाठी पुढील पाच वर्षांत प्रत्येकी 5,000 कोटी रुपये उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रासाठी प्रमुख तरतुदी (प्राथमिक आकडेवारी)
महाराष्ट्र ग्रामीण रस्ते प्रकल्प – 378.38 कोटी
महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस प्रकल्प – 167.28 कोटी
इकॉनॉमिक क्लस्टर (सर्वसमावेशक विकास) – 283.77 कोटी
टर्शरी केअर व वैद्यकीय शिक्षण विकास – 385.78 कोटी
उपसा सिंचन योजनांचे सौर ऊर्जीकरण – 207.10 कोटी
शेती व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प – 646.24 कोटी
कौशल्य व अप्लाईड नॉलेज प्रकल्प – 313.65 कोटी
जिल्हा पातळीवरील संस्थात्मक क्षमतावृद्धी – 240.90 कोटी
मुंबई–अहमदाबाद हायस्पीड कॉरिडॉर – 6,103 कोटी
मुंबई मेट्रो – 1,702 कोटी
एमयुटीपी–3 – 462 कोटी
एमएमआर ग्रीन मोबिलिटी – 155.32 कोटी
समृद्धी महामार्ग (ITS) – 680.79 कोटी
पुणे मेट्रो – 517.74 कोटी
ही आकडेवारी प्राथमिक असून, एकूण प्रकल्प निधी सुमारे 12,355 कोटी रुपये इतका आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.