CM Eknath Shinde Gadlchiroli Tour: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. याठिकाणी ते पोलिसांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता, पत्रकारांनी त्यांना शिंदे (Eknath Shinde) गटातील नाराज आमदारांबाबत प्रश्न विचारला. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नसल्यानं आमदार नाराज आहेत का? असा सवाल पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारला. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. (Eknath Shinde Latest News)
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर अनेक आठवडे मंत्रिमंडळ नियुक्त केले गेले नव्हते. मात्र, विरोधकांकडून टीका होऊ लागल्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटातील आणि भाजपमधील एकूण १८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात सर्व प्रमुख नेते होते. मात्र, अनेक बडे आमदार अजूनही मंत्रिपदाच्या प्रतिक्षेत आहेत. दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांची वर्णी लागेल अशी या आमदारांना आशा आहेत. (CM Eknath Shinde On Cabinet Expansion)
मात्र, सत्तेच्या १०० दिवसांनंतरही मंत्रिपद न मिळाल्याने काही आमदार अस्वस्थ झाल्याची चर्चा आहे. यात शिवसेनेतील शिंदे गटाच्या आमदारांची संख्या मोठी असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. याबाबत आज, पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारलं असता त्यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, "या गोष्टी होत राहतात, योग्य वेळी सर्व गोष्टी होतील" असं म्हणत त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्वाची माहिती दिली आहे. (Maharashtra News)
राज्याच्या पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात एकूण १८ मंत्र्यांनी शपत घेतली. शिंदे गटातील दादा भुसे, संदीपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, दीपक केसरकर, शंभुराज देसाई, अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील, संजय राठोड यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तर भाजपकडून सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, अतुल सावे, विजयकुमार गवित, मंगलप्रभात लोढा, सुरेश खाडे, रविंद्र चव्हाण यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, सरकार बरखास्तीची मागणी हास्यास्पद आहे. कारण आज राज्यात थंपिंग बहुमत असलेलं सरकार आहे. तीन महिन्यांत आम्ही ७२ मोठे आणि राज्याच्या हिताचे निर्णय घेतले आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप ३९७ ग्रामपंचायतींसह पहिला नंबरचा पक्ष आहे. त्यानंतर बाळासाहेबांची शिवसेना २४३ ग्रामपंचायतींसह दुसऱ्या नंबरवर आहे. तो आकडा आणखी वाढेल. या यशामुळे विरोधकांना धडकी भरली आहे. विरोधी पक्ष बोलत असतात, बोलू द्या. विरोधी पक्ष टीका करतायत, आम्ही टीकेला कामाने उत्तर देऊ असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यात पोलिसांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. याबाबत ते म्हणाले की, पालकमंत्री असताना माझं विकासांचं टार्गेट होतं, त्याचवेळेस मी दरवर्षी गडचिरोली पोलिसांसोबत दिवाळी साजरी करत होतो. आता मुख्यमंत्री आहे, मी जे सुरु केलंय ते कायम ठेवलंय. याचा मला आनंद आहे. पोलिस अतिदुर्गम भागात नक्षलवाद्यांशी लढून आपलं संरक्षण करतात, त्यांना दिवाळीचा आनंद घेता यावा हाच उद्देश आहे असं ते म्हणाले. तसेच आज भामरागड आऊटपोस्ट दिवाळी साजरी करणार, यामुळे पोलिसांचं मनोबल वाढतं असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
त्याचप्रमाणे नक्षलवाद कमी होत चाललाय. गडचिरोलीचा विकास होतेय. उद्योग सुरु होत आहे. नक्षलवाद संपवण्यात पोलीसांचं मोठं योगदान आहे. शहरी नक्षलवादावर सरकारचं लक्ष आहे. जसं या नक्षलवादाचा बिमोड करायचा आहे, तसाच शहरी नक्षलवादाचा बिमोड करायचा आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.