मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यातील भाजप नगरसेवकांसोबत महत्त्वाची बैठक
“आधी काम दाखवा, मग पद मागा” असा नगरसेवकांना स्पष्ट संदेश.
बैठकीला भाजपचे नगरसेवक, आमदार आणि मंत्री उपस्थित
'आधी काम दाखवा मग पद मागा' असा सज्जड दम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील नगरसेवकांना दिला. आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज पुण्यातील भाजप नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी पदाची मागणी करणाऱ्या नेत्यांना रिपार्ट कार्ड दाखवा, अशी सुचना केलीय. विधानपरिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जातेय.
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी आयोजित या बैठकीला भाजपचे सर्व नगरसेवक, आमदार आणि मंत्री उपस्थित होते. आगामी काळात पदे मिळवण्यासाठी नगरसेवकांमध्ये असलेली स्पर्धा लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी नगरसेवकांकडून कामाचा हिशोब मागितला. नगरसेवकांनी आपल्या प्रभागात किती आणि कसं काम केलं आहे, याचा संपूर्ण आढावा घेतला जाईल. केवळ लॉबिंग करून किंवा मागण्या करून पदे मिळणार नाहीत, असे मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत स्पष्ट केलंय.
मुख्यमंत्र्यांनी पुण्यातील नगरसेवकांच्या बैठकीत नगरसेवकांच्या कामाचा आढावा घेण्यावर भर दिला. तसेच पदाची मागणी करण्यापूर्वी आपल्या कामाचा हिशोब द्यावा लागेल, असा स्पष्ट संदेश मुख्यमंत्र्यांनी नगरसेवकांना दिलाय. भविष्यात कोणत्याही पदाची मागणी केल्यास त्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला जाईल, अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडल्याचं सांगितलं जातंय. 'उद्या माझ्याकडे पद मागायला आलात, तर सर्वात आधी तुमचं रिपोर्ट कार्ड काढेल. तुम्ही किती आणि कसं काम केलं, याचा आढावा घेतल्यानंतरच पुढचा विचार केला जाईल,' असा इशारा मुख्यमंत्र्यांनी नगरसेवकांना दिलाय.
नगरसेवकांनी आपल्या भागात केलेली विकासकामं, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न आणि पक्षासाठी दिलेलं योगदान यांचा आढावा घेतला जाण्याचे संकेत या बैठकीतून मिळाल्याचं सांगितलं जातंय. पद देताना केवळ मागणीचा विचार न करता कामगिरीला महत्त्व दिलं जाईल, असा या भूमिकेचा अर्थ लावला जातो.
पुणे शिक्षक, पदवीधर निवडणुकीत आपला विजय झाला पाहिजे. आपला विजय झाला पाहिजे जास्तीत जास्त मतदारांपर्यंत जा अशा सूचना देखील फडणवीसांनी या वेळी दिल्या. यावेळी जास्तीत जास्त मतदान घडवून आणण्यासाठी नगरसेवकांनी सक्रिय व्हावे, प्रत्येकाने आपल्या भागात विशेष प्रयत्न करावेत आणि निवडणुकीच्या कामाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे निर्देशही त्यांनी दिलेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.