

भुषण अहिरे, साम प्रतिनिधी
धुळे जिल्हा कारागृहाचे अधीक्षक एकनाथ शिंदे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. शासकीय निवासस्थानी असताना त्यांची अचानक प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. विशेष म्हणजे, शासकीय सेवेतून निवृत्त होण्यासाठी त्यांचे अवघे ३ महिने शिल्लक होते. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असतानाच त्यांचे निधन झाल्याने पोलीस दलासह कारागृह प्रशासनात शोककळा पसरलीय.
पोलीस अधीक्षक एकनाथ शिंदे हे दिवसभरातील कामकाज आटोपून संध्याकाळच्या सुमारास आपल्या शासकीय निवासस्थानी परतले होते. याचदरम्यान अचानक त्यांची तब्येत खालावली. त्यांची प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच निवासस्थानी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी आणि कुटुंबीयांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, वैद्यकीय उपचार सुरू होण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला.
एकनाथ शिंदे यांनी 1997 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागात आपल्या शासकीय सेवेची सुरुवात केली होती. प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी कारागृह प्रशासनातील विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. कामाचा अनुभव आणि प्रशासकीय जबाबदारी लक्षात घेऊन डिसेंबर 2020 मध्ये त्यांना पदोन्नती देण्यात आली. त्यानंतर त्यांनी धुळे जिल्हा कारागृहाच्या अधीक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली.
महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागाच्या अधिकृत नोंदींनुसार, ते धुळे जिल्हा कारागृहात अधीक्षक आणि अपील अधिकारी म्हणून कार्यरत होते. प्रशासकीय कामकाजाबरोबरच न्यायबंद्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना कायदेविषयक मदत मिळावी, यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला होता. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सहकार्याने धुळे कारागृहात कायदेविषयक मदत कक्ष सुरू करण्यात आला होता. या कक्षाच्या स्थापनेत एकनाथ शिंदे यांचा सक्रिय सहभाग होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.