माधव सावरगावे, साम टीव्ही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज छत्रपती संभाजीनगर येथे विविध विकासकामांचे लोकार्पण पार पडले. यामध्ये विभागीय क्रीडा संकुलातील अत्याधुनिक क्रीडासुविधा, महानगरपालिकेचे पर्यावरणपूरक वाहतूक आणि ऊर्जा प्रकल्प तसेच शैक्षणिक सुविधांचा समावेश आहे. विभागीय क्रीडा संकुल, गारखेडा येथे सायंकाळी ५ वाजता आयोजित कार्यक्रमात ४०० मीटर सिंथेटिक ॲथलेटिक्स ट्रॅक, फुटबॉल मैदान, स्टेडियम मास्ट (फ्लड लाईट्स) आणि युवा वसतिगृहाचे उद्घाटन झाले.
संकुलात १२ कोटी ७५ लाख रुपये खर्चून आठ लेनचा सिंथेटिक ट्रॅक व नैसर्गिक हिरवळीचे फुटबॉल मैदान विकसित करण्यात आले आहे. १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेसाठी दहा लेन उपलब्ध असून विविध मैदानी स्पर्धांसाठीही सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. दहा हजार प्रेक्षक क्षमतेच्या स्टेडियममध्ये चार उंच मास्टवर एकूण ८८ दिव्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी ११ कोटी ६७ लाख ४२ हजार रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे सायंकाळच्या वेळेतही खेळाडूंना सराव व स्पर्धांचे आयोजन करता येणार आहे.
तसेच चार कोटी रुपयांच्या निधीतून १६ खोल्यांचे युवा वसतिगृह उभारण्यात आले आहे. त्यामध्ये परिषद सभागृह, स्वयंपाकगृह, भोजनगृह, ग्रंथालय व वाचन कक्षाची सुविधा आहे. या सर्व सुविधांमुळे मराठवाड्यातील खेळाडूंना दर्जेदार सराव, प्रशिक्षण व निवासाची सोय एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका व औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ३४ वातानुकूलित इलेक्ट्रिक बसचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या बसमुळे नागरिकांना आरामदायी, सुरक्षित व पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय मिळणार आहे. पीएम ई-बस योजनेअंतर्गत आणखी १०० इलेक्ट्रिक बस सुरू करण्याचे नियोजन आहे.
इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी कॅनॉट गार्डन व बाबा पेट्रोल पंपाजवळील भगवान महावीर उड्डाणपुलाखाली ई-व्ही चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहेत. शहरात आणखी दहा ठिकाणी चार्जिंग स्टेशन विकसित करण्याचे नियोजन आहे. तसेच सिद्धार्थ उद्यान वाहनतळावर १०० किलोवॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे विजेची बचत होण्यासह पर्यावरण संवर्धनाला हातभार लागणार आहे. महानगरपालिकेच्या मिटमिटा येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या नवीन इमारतीचेही उद्घाटन झाले. या इमारतीत २४ वर्गखोल्या, ग्रंथालय, संगणक कक्ष, विज्ञान प्रयोगशाळा, डिजिटल शिक्षण सुविधा व क्रीडांगणाची व्यवस्था करण्यात आली आहे. आधुनिक सुविधांमुळे परिसरातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी चांगले वातावरण उपलब्ध होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.