देशाचे ५२ वे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा आज मुंबईत बार कौन्सिल ऑफ इंडियाच्यावतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात त्यांनी आपला संघर्षमय प्रवास सांगितला. अमरावती नगर परिषद शाळा ते सर्वोच्च न्यायालयापर्यंतच्या प्रवासात किती चढ उतार पाहिले, याबाबत त्यांनी उपस्थितांना माहिती दिली. यावेळी आई-वडिलांच्या कष्टांची आणि त्यागाची आठवण करून देताना गवई यांना अश्रू अनावर झाले, आणि उपस्थित सभागृहही भारावून गेलं.
सत्कार कार्यक्रमात सरन्यायाधीश म्हणाले, 'माझी सुरुवात खरंतर अमरावतीच्या नगरपरिषदेच्या शाळेतून झाली. परिस्थिती बेताची होती. वडिलांनी चळवळीत पूर्ण झोकून दिलं होतं. त्यामुळे घराची सगळी जबाबदारी आईवर आली. आम्ही सर्व भावंडं एकत्र होतो. लहानपणापासून आईकडून खूप शिकलो आज मी जो कुणी आहे, ते फक्त आई - वडिलांचे संस्कार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आहे', असं गवई म्हणाले.
या भावनिक क्षणी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या त्यांच्या मातोश्री कमलाबाई गवई यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी पदराने डोळे पुसले. यावेळी सरन्यायाधीश देखील गहिवरले.
गवई म्हणाले, 'वडील ज्या-ज्या कार्यक्रमात जायचे, मी देखील जायचो. भारतीय राज्यघटना त्यांना ज्ञात होती. माझ्या वाटचालीतही राज्य घटनेचा मोठा वाटा आहे', असं भाषणावेळी त्यांनी सांगितलं.
वकिलीच्या सुरूवातीच्या काळातील आठवणी सांगताना गवई म्हणाले, 'सन १९८५ मध्ये मी राजाभाऊ भोसलेंसोबत वकिली सुरू केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना खूप काही शिकालो. वकिलांचे युक्तीवादही ऐकायला मिळालं. याच काळात माझ्या पुढाकाराने उच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावण्यात आला. सुप्रीम कोर्टातही न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या परवानगीने बाबासाहेबांचा पुतळा उभारता आला. ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे, असं गवई यांनी सांगितलं.
सर्वोच्च न्यायालयात कार्यरत असताना त्यांनी घेतलेल्या काही निर्णयाबाबतही त्यांनी सांगितलं. 'नागपूरच्या एका न्यायाधीशांनी झोपडपट्ट्या पाडण्याचे आदेश दिले होते. मी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि त्या लाखो लोकांच्या घरांवरचं छत वाचवू शकलो. ही माझ्यासाठी समाधानाची गोष्ट आहे,” असं त्यांनी सांगितलं.
शेवटी त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं, 'माझी इच्छा मुख्य न्यायाधीश व्हायची होती, आणि ती मी कधी लपवली नाही. आज ती पूर्ण झाली, असं गवई म्हणाले. गवई यांचं संघर्षमय प्रवास ऐकल्यानंतर अनेकांचे डोळे पाणावले. दरम्यान, सत्कार स्वीकारल्यानंतर भूषण गवई यांनी चैत्यभूमी येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.