संजय जाधव, बुलडाणा
Chandrayaan-3 Mission Latest Update: भारतीयांसाठी आजचा दिवस खूपच महत्वाचा आहे. आज भारत इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी आता अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांची भारताचे महत्वकाक्षी चांद्रयान 3 (Chandrayaan 3) चंद्रावर लँडिंग करणार आहे. याकडे संपूर्ण भारतीयांचे लक्ष लागले आहे. इस्रोच्या (ISRO) या मोहिमेमध्ये महाराष्ट्रातल्या बुलडाणा (Buldhana) जिल्ह्याचा मोलाचा वाटा आहे.
देशासाठी महत्त्वकांक्षी आणि अभिमानास्पद असलेलं चांद्रयान - 3 या मोहिमेत बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील दोन वस्तूंचा वापर करण्यात आला आहे. खामगाव येथील प्रसिद्ध असलेली चांदी आणि प्रसिद्ध असलेले थर्मल फॅब्रिक्स यांचा चांद्रयान 3 मोहिमेत वापर करण्यात आला आहे. त्यामुळे आता खामगावसह राज्यासाठी ही अभिमानास्पद बाब आहे.
चांद्रयान 3 चं आज चंद्रावर लँडिंग होणार आहे. त्यानिमित्त खामगाव येथील चांदीचे सुटे भाग आणि थर्मल फॅब्रिक्स आज चंद्रावर पोहचणार आहे. त्यामुळे या दोन्ही वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या श्रद्धा रिफायनरी आणि विकमसी फॅब्रिक्स यांच्यासाठी आजचा दिवस हा खूप मोठा आणि आनंदाचा आहे.
खामगावला देशाची रजतनगरी म्हणून ओळखले जाते. खामगावची शुद्ध चांदी प्रसिद्ध आहे. ही चांदी चांद्रयान 3 मधील स्टर्लिंग ट्यूबमध्ये वापरण्यात आली आहे, अशी माहिती श्रद्धा रिफायनरीने दिली आहे. तर, चांद्रयानचे उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आवश्यक असणारे रबराईज्ड फॅब्रिक खामगावमधून पाठवण्यात आले आहे.
महत्वाचे म्हणजे, चांद्रयान 3 मोहिमेमध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांचा मोलाचा वाटा आहे. या मोहिमेसाठी बुलडाणातल्या खामगावातून चांदी आणि थर्मल फॅब्रिक्स पाठवण्यात आले. जळगावात तयार करण्यात आलेले एचडी वर्षा नोझल्स पाठवण्यात आले. सांगलीत चांद्रयानच्या पार्ट्सचं कोटिंग करण्यात आले. पुण्यामध्ये फ्लेक्स नोजल आणि बूस्टर तयार करण्यात आले. जुन्नरच्या शास्त्रज्ञांचे देखील या मोहिमेत महत्वाचे योगदान आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.