महायुतीत जागावाटपावरून मोठी रस्सीखेच होणार आहेत. कारण भाजपनं मिशन 125 चा नारा दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. १२५ जागा जिंकण्यासाठी भाजपनं थेट १६० जागा लढवण्याचा आग्रह धरलाय. मुंबई दौ-यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसमोरच भाजपच्या नेत्यांनी हा प्रस्ताव मांडल्याचं समजतंय. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आणि आमदार पंकजा मुंडे उपस्थित होत्या.
गेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीत सर्वाधिक स्ट्राईक रेट हा शिंदे गटाचा आहे. मात्र शिंदे गटाच्या यशात भाजपचा मोठा वाटा असल्याचा दावा या बैठकीत भाजप नेत्यांनी केल्याचं सूत्रांचं म्हणणंय. त्यामुळे मिशन १२५ साठी भाजपनं विशेष रणनीती आखलीय.
भाजपचा विधानसभेत 160 जागा लढवण्याची योजना आखली आहे. भाजपने 160 पैकी 125 जागा जिंकण्याची रणनीती आखली आहे. 125 पैकी 50 जागांवर भाजपला विजयाची खात्री आहे. इतर 75 जागा जिंकण्याची जबाबदारी प्रमुख नेत्यांवर सोपवण्यात आलीय.
मात्र भाजपच्या या मिशन १२५मुळे शिंदे गट आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला टेंशन आलंय. जर भाजपनं १६० जागा लढवल्या तर महायुतीत १२८ जागा शिल्लक राहतात. या जागांच समान वाटप करून शिंदेंच्या शिवसेनेची आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीची प्रत्येकी 64-64 जागांवर बोळवण करण्यात येणार असल्याचं सूत्रांचं म्हणणंय.
अजित पवारांनी जाहीररित्या 60 जागा लढवण्याची अपेक्षा व्यक्त केलीय. त्यामुळे राष्ट्रवादीबाबत तिढा निर्माण होण्याची शक्यता कमी आहे. मात्र लोकसभेत सर्वाधिक यश मिळवणा-या शिंदे गटाला हा फॉर्म्युला मान्य होणार का? की अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या आणखी जागा कमी करून शिंदेंची मनधरणी केली जाणार याची उत्सुकता आहे. त्यामुळेच भाजपच्या या मिशनचं अजितदादांच्या राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेचं टेंशन वाढलं असणार एवढं नक्की.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.