भेंडवळ येथे पारंपरिक भाकीत जाहीर
पावसाचा मिश्र अंदाज, काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता
पिकांवर रोगराईचा धोका
आर्थिक स्थितीबाबत नकारात्मक संकेत
बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात पूर्णा नदीकाठी वसलेल्या भेंडवळ गावात सुमारे ३७० वर्षांपासून चालत आलेली घटमांडणीची परंपरा आजही मोठ्या श्रद्धेने जोपासली जात आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर केली जाणारी ही मांडणी आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी जाहीर होणारे अंदाज याकडे केवळ विदर्भच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले असते.
भेंडवळ येथील घटमांडणीची परंपरा १७व्या शतकात चंद्रभान महाराज वाघ यांनी सुरू केल्याचे सांगितले जाते. निसर्गातील सूक्ष्म बदल, वाऱ्याची दिशा, पक्ष्यांचे आवाज यांचा अभ्यास करून त्यांनी पाऊस व पीक परिस्थितीचा अंदाज व्यक्त करण्याची पद्धत विकसित केली. आजही त्यांचे वंशज ही परंपरा पुढे नेत असून पुंजाजी महाराज वाघ आणि सारंगधर महाराज घटाची पाहणी करून अंदाज जाहीर करतात.
या मांडणीत अठरा प्रकारची धान्ये वर्तुळाकार पद्धतीने मांडली जातात. मध्यभागी चार मातीची ढेकळे ठेवून त्यावर पाण्याने भरलेली घागर ठेवली जाते. घागरीवर विविध खाद्यपदार्थ ठेवले जातात, तर खाली विड्याचे पान आणि सुपारी ठेवून प्रतीकात्मक रचना केली जाते. या संपूर्ण मांडणीतील रात्रीभर होणाऱ्या नैसर्गिक बदलांवरून पुढील वर्षाचे अंदाज काढले जातात.
पहाटे घटातील बदलांचे निरीक्षण करून पाऊस, हवामान, पीक स्थिती, तसेच देशातील राजकीय, आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीबाबत संकेत दिले जातात. मातीच्या ढेकळांवरून पावसाचे चार महिन्यांचे चित्र मांडले जाते, तर विविध धान्यांवरून पिकांची स्थिती सांगितली जाते. पान-विडा राजकीय परिस्थितीचे, तर करंजी आर्थिक स्थितीचे प्रतीक मानले जाते. शेतकऱ्यांचा विश्वास कायम भेंडवळ येथे दरवर्षी हजारो शेतकरी मुक्काम करून हे भाकीत ऐकण्यासाठी एकत्र येतात. विदर्भ, मराठवाडा, खान्देशातून मोठी उपस्थिती असते. शेतकरी या अंदाजांच्या आधारे पेरणी, पीक निवड आणि शेतीचे नियोजन करत असल्याचे दिसून येते. शास्त्रीय आधारावर प्रश्न या परंपरेला शास्त्रीय आधार नसल्याचे तज्ज्ञांचे मत असले तरी शेतकऱ्यांमध्ये तिचे महत्त्व कायम आहे. काही सामाजिक संघटनांनी याला अंधश्रद्धा म्हणत शेतकऱ्यांना यावर अवलंबून न राहण्याचे आवाहन केले आहे.
पावसाचा अंदाज
पहिला महिना – पाऊस कमी
दुसरा महिना – साधारण
तिसरा महिना – चांगला, अतिवृष्टीची शक्यता
चौथा महिना – पाऊस राहणार
अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता
कपाशी – साधारण
ज्वारी – सर्वसाधारण, दर जास्त
तूर – अनिश्चित
मूग – सर्वसाधारण, दर जास्त
उडीद – रोगराई जास्त
तीळ – चांगले
भादली – रोगराई, तरी पीक चांगले
बाजरी – चांगली
मटकी – सर्वसाधारण
साळी – चांगली
जवस – कमी उत्पादन
लाख – चांगले
वाटाणा, गहू, हरभरा, करडई, मसूर – सर्वसाधारण
रोगराईचे प्रमाण वाढण्याची शक्यता
जनावरांना चारापाणी उपलब्ध
देशाची आर्थिक स्थिती मजबूत राहण्याची शक्यता कमी
“राजा कायम” – म्हणजेच पंतप्रधान पद कायम राहण्याचे संकेत
भेंडवळची ही पारंपरिक घटमांडणी विज्ञानाच्या युगातही टिकून आहे. श्रद्धा आणि संशय यांच्या दरम्यान उभी असलेली ही परंपरा आजही शेतकऱ्यांसाठी आशा, मार्गदर्शन आणि चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.