प्रेमविवाह केल्यामुळे अनेक चांगल्या आणि वाईट घटना घडलेल्याच्या बातम्या आतापर्यंत आपण पाहिल्या आहेत. मात्र आता एक अशा प्रेमविवाहाच्या घटनेमुळे तुम्हालाही अशा अंधविश्वासू जात पंचायतीचा राग येईल. लोकशाही असणाऱ्या या देशांमध्ये जातपंचायत बोलावणं हा कायद्याने गुन्हा मानला जातो. मात्र हा गुन्हा आजही काही समाजामध्ये सर्रास करत असल्याचा प्रकार बीडच्या आष्टी पोलिस ठाण्याच्या हद्दीत समोर आलाय. सासऱ्याच्या प्रेमविवाहाची सुनेला शिक्षा मिळाली आहे. सात पिढ्या समाजातून तिला बहिष्कृत करण्यात आले आहे. याप्रकरणी ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सासऱ्याने समाजाची परवानगी न घेता प्रेमविवाह केला. त्यामुळे त्यांना तेव्हा अडीच लाख रूपयांचा दंड ठोठावला. त्यांनी तो न भरल्याने सुनेसह मुलाला जात पंचायतमध्ये बोलावले. त्यांनीही असमर्थता दर्शविल्याने पंचांनी या कुटुंबाला सात पिढ्या समाजातून बहिष्कृत करण्याचा आदेश दिला. तसेच पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यास जीवे मारू अशा प्रकारच्या धमक्याही दिल्या. हा प्रकार २२ सप्टेंबर २०२४ रोजी आष्टी तालुक्यातील डोईठाण येथे घडलाय. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र अखेर ९ जणांविरोधात आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा जात पंचायतचा मुद्दा समोर आल्याने खळबळ उडाली आहे
मालन शिवाजी फुलमाळी (३२ वर्षे) असं या पीडित महिलेचे नाव आहे. मालन यांचे सासरे नरसू फुलमाळी यांनी समाजाची परवानगी न घेता प्रेमविवाह केला होता. त्यांची जात नंदीवाले (तीरमाली) अशी आहे. सासऱ्याने प्रेमविवाह केल्यानंतर जात पंचायत बसविण्यात आली. यामध्ये नरसू फुलमाळी यांना २ लााख ५० हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला. पण अनेक वर्षे उलटल्यानंतरही त्यांनी हा दंड भरला नाही. त्यामुळे २१ सप्टेंबर २०२४ रोजी अहमदनगरच्या नेवासा तालुक्यात राहणारे शिवाजी पालवे यांच्यामार्फत जात पंचायतमध्ये मालन यांना बोलावण्यात आले. ही पंचायत आष्टी तालुक्यातील डोईठाण येथे होती.
या पंचायतीमध्ये मालन आपले पती शिवाजी आणि मुलांसह तिथे पोहचल्या होत्या. या ठिकाणी पंचांसह समाजाचे ८०० ते ९०० लोकं आगोदरच एकत्र आले होते. त्यादिवशी निर्णय झाला नाही. त्यानंतर २२ सप्टेंबर रोजी पुन्हा जात पंचायत बोलावली. सकाळी ११ पंचांसमारे त्यांना उभे केले. सासऱ्याने दंड भरला नाही म्हणून तुम्ही भरा असे त्यांना सांगितले गेले. तुम्हीही दंड भरला नाही तर समाजातून तुम्हालाही बहिष्कृत करू, तसेच पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारू अशा धमक्या दिल्या गेल्या.
शेवटी मालन यांनी दंड भरू न शकल्याने पंचांनी त्यांच्यासह त्यांच्या कुटूंबाला ७ पिढ्या समाजातून बहिष्कृत करण्याचा आदेश दिला. त्यामुळे मालन यांनी आष्टी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यावरून आष्टी पोलिस ठाण्यात गंगाधर बाबु पालवे, उत्तम हनुमंत फुलमाळी, गंगा गंगाराम फुसमाळी, चिन्नु साहेबराव फुलमाळी, सुभाष फुलमाळी, बाबुराव साहेबराव फुलमाळी, शेटीबा रामा काकडे, सयाजी सायबा फुलमाळी, गुलाब पालवे यांच्यासह इतर पंचांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्वांवर सामाजिक बहिष्कार अधिनियम २०१६ मधील जनतेचे महाराष्ट्र संरक्षण ४, ५, ६ तसेच बीएनएस १८९ (२), ३५१ (२) (३), ३५२ अशा कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.