बीड, ता. २६ सप्टेंबर
Yogesh Kshirsagar ON MLA Sandip Kshirsagar: आमदार संदीप क्षीरसागरांच्या टक्केवारीमुळेच बीड शहरात दर्जाहीन कामे झाले आहेत. आणि यामुळं आता मुख्य महामार्ग असणारा जालना रोड पाण्याखाली जात आहे. यामुळं नागरिकांना होत असलेल्या त्रासाला आमदारचं जबाबदार आहेत. असं म्हणत नगरसेवक योगेश क्षीरसागरांनी पत्रक काढून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. क्षीरसागर यांच्या या आरोपांमुळे बीडमध्ये राजकारण तापण्याची शक्यता आहे.
काय म्हणालेत योगेश क्षीरसागर?
गेल्या 5 वर्षांच्या कार्यकाळात बीडच्या आमदारांना एक काम धड करता आले नाही. जे केले त्या कामांमध्ये ठेकेदारांकडून वाट्टेल तितकी टक्केवारी घेतल्याने कामे दर्जाहीन झाली. याचा उत्तम नमुना म्हणून जालना रोडच्या कामाकडे पाहता येईल. एका पावसात शहरातील हा रस्ता पाण्याखाली जात असून नागरिकांना होत असलेल्या त्रासाला बीडचे आमदारच सर्वस्वी जबाबदार आहेत," असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड विधानसभा अध्यक्ष नगरसेवक डॉ.योगेश क्षीरसागर यांनी केला आहे.
तसेच "बीड शहरातून जाणार्या जालना रोडवरील जनता गॅरेजपासून साई पॅलेसपर्यंत करण्यात आलेला रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा झालेला आहे. हे काम आमदारांनी श्रेय लाटण्यासाठी हस्तक्षेप करून घाईघाईत करून घेतले. परंतु, वाट्टेल तितकी टक्केवारी घ्यायची सवय झाल्याने या कामात डिव्हायडर उभारण्यात आले नाही. दुतर्फा नाल्या करण्यात आल्या नाहीत. परिणामी, झालेल्या पावसाने पाणी व्यवसायिकांच्या दुकानांसह घरांमध्ये शिरले," असंही ते म्हणालेत.
डिव्हायडर नसल्याने अनेकदा गाड्या स्लिप होऊन अपघात होत आहेत. नागरिकांना होत असलेला त्रास आमदारांनी काम करताना केलेल्या हस्तक्षेपामुळे होत आहे. त्यांच्या काम करण्याच्या चुकीच्या पद्धतीची फळे बीडवासियांना भोगावी लागत आहेत, असेही डॉ.योगेश क्षीरसागर यांनी म्हटले आहे. या आरोपांवर आता आमदार संदीप क्षीरसागर काय बोलणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.