तुरीची शेंग दीड वर्षीय चिमुकलीच्या जीवावर बेतल्याची दुर्दैवी घटना बीडमध्ये उघडकीस आली आहे. तुरीची शेंग खाताना घशात अडकल्याने श्वास गुदमरून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. ही घटना बीडच्या गेवराई तालुक्यात असणाऱ्या श्रीपत अंतरवाला गावामध्ये घडली आहे. ज्ञानदा विजय आरदड असे मयत चिमुकलीचे नाव आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मयत ज्ञानदाची आई घरकामात व्यस्त असताना ती बाहेरील मोकळ्या जागेत खेळत होती. यावेळी तिने तुरीची शेंग तोंडात घातली. काही वेळाने शेंग घशात अडकल्याने तिला श्वास घेताना त्रास होऊ लागला. आपल्या बाळाला त्रास होत असल्याचं आईच्या लक्षात आलं. त्यानंतर कुटुंबीयांनी तात्काळ तिला रामपुर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.
मात्र डॉक्टरांनी तिला बीडला घेऊन जाण्याचा सल्ला दिला. बीडमधील डॉक्टरांनी ज्ञानदाची चिंताजनक प्रकृती पाहता तिला छत्रपती संभाजीनगर येथे नेण्याचा सल्ला दिला. दरम्यान उपचारादरम्यान तिचा मृत्य झाला. या दुर्दैवी घटनेने बीडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
लहान मुल संभाळणं म्हणजे जगातील सर्वात कठीण काम, असं अनेक जण म्हणतात. लहान मुलं कधी काय करतील याचा काही नेम नसतो. डोळ्यात अगदी तेल घालून त्यांच्यावर लक्ष द्यावे लागते. जरा जरी दुर्लक्ष झाले तरी मोठी दुर्घटना घडते. आपल्या गोंडस मुलीच्या निधनामुळे तिच्या आई वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
आपल्या समोर हसणारी, खेळणारी चिमुकली अचानक आपल्या नजरेपासून अशा पद्धतीने दूर होईल याचा त्यांनी कधी विचारही केला नव्हता. चिमुकलीच्या आठवणीत संपूर्ण गावातून हळहळ व्यक्त होतेय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.