मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना आजही दिलासा मिळाला नाही. राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून यासंबधित जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तीवाद झाला. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतला. मात्र तरीही दोघांच्या युक्तीवादानंतर न्यायालयाकडून आज निकाल जाहीर करण्यात आला नाही. आता राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर सोमवारी (2 मे) सुनावणी होईल. त्यामुळे राणा दाम्पत्याला पुढील दोन दिवस कोठडीतच राहावं लागणार आहे.
दरम्यान, विशेष सरकारी वकील प्रदिप घरत यांनी काल कोर्टात 18 पानी लेखी युक्तीवाद सादर केला होता. त्यानंतर आज या प्रकरणावर सुनावणी झाली. कोर्टात युक्तीवाद सरकारी वकिलांनी राणा दाम्पत्याच्या जामिनाला कडाडून विरोध केला आहे. राणा दाम्पत्य तुरुंगातून बाहेर आल्यास पुन्हा तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात असा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. दुसरीकडे नवनीत राणा यांची तब्येत बरी नसल्यानं त्यांना जे जे रुग्णालयात नेण्यात यावं, अशी मागणी त्यांच्या वकिलांनी केली. राणा यांना तुरुंगात नीट अन्न आणि उपचार मिळत नसल्याचा दावाही त्यांच्या वकिलांनी केला आहे.
काय आहे प्रकरण?
काही दिवसांपूर्वी राणा दाम्पत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठण करणार असल्याची घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेनंतर शिवसैनिक आक्रमक झाले होते. त्यानंतर खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) शिवसैनिकांना चकमा देत अमरावतीहून मुंबईतल्या निवास्थानी आले होते. तिथे आल्यांनंतर शिवसैनिकांनी त्यांना घेराव घातला होता. झालेल्या संघर्षानंतर राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक करत त्यांच्यावर राजद्रोहाचाही गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, 24 एप्रिलपासून राणा दाम्पत्य हे न्यायालयीन कोठडीत असून त्यांनी केलेल्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. पण या सुनावणीत निकाल जाहीर करण्यात आला नाही. सध्या राणा दाम्पत्य कारागृहात असून खासदार नवनीत राणा भायखळा कारागृहात आहेत, तर आमदार रवी राणा तळोजा कारागृहात आहेत.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.