Beed Santosh Deshmukh murder case : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीसह अन्य तीन आरोपींना तातडीने अटक करावी, सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी आज सकाळी १० वाजता बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.
काळे कपडे व काळ्या फिती लावून मोर्चेकरी सहभागी होणार आहेत. मूक मोर्चाच्या निमित्ताने आज सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत बीड शहरातील चार प्रमुख मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. मोर्चातील हालचालीवर दोन ड्रोनची नजर राहणार असून ७४ अधिकाऱ्यांसह साडेतीनशे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.
सरपंच पती संतोष देशमुख यांची हत्या होऊन १८ दिवस उलटले, तरी यातील सुदर्शन घुलेसह तिघे जण अजूनही मोकाटच आहेत. या प्रकरणातील मास्टरमाईंडचा शोध घेण्यात सीआयडीला अपयश आलेले आहे. फरार असलेला मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे आणि दोन कोटींच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड या चार जणांना अटक करण्यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाला चार दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आलेला आहे. परंतु दिलेल्या चार दिवसांत पोलीस चारही आरोपीला अटक करू शकले नाहीत. त्यामुळे दिलेला अल्टिमेटम संपल्यामुळे आज सर्वपक्षीय मोर्चा निघत आहे.
बीड शहरात शनिवारी काढण्यात येणाऱ्या सर्वपक्षीय मुक मोर्चात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची मुले व पत्नी सहभागी होणार आहेत. दिवंगत देशमुख यांची मुलगी वैभवी, भाऊ धनंजय यांच्यासह मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रतोद जितेंद्र आव्हाड, यांच्यासह भाजप आमदार सुरेश धस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर आदी या मोर्चात सहभागी होणार आहेत.
सरपंच पती संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना विरोधी पक्षाच्या नेत्यांसह सत्तारुढ भाजपमधील नेत्यांनीही कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळुंके यांनीही मुंडे यांच्यावर शरसंधान केल्याने धनंजय मुंडे यांची चोहीबाजूने कोंडी होताना दिसत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.