सचिन कदम
अलिबाग : गावात पाणी योजना मंजूर झाल्यानंतर ती राबविण्यात आली. मात्र या योजनेला सहा वर्षांचा कालावधी लोटला गेला असताना ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे गावात पाणी पोहचले नाही. परिणामी ग्रामस्थांना आज देखील दूरवरून पाणी आणावे लागत असते. दरम्यान या संदर्भात गावात बोलावण्यात आलेल्या बैठकीत संतप्त ग्रामस्थांनी योजनेचे काम करणाऱ्या ठेकेदाराला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.
अलिबाग (Alibag News) तालुक्यातील ताडवागळे गावात पाणी पुरवठा योजना राबविण्यात आली होती. साधारण सहा वर्षांपूर्वी सदर योजनेच्या कामाला सुरवात करण्यात आली होती. ताडवागळे गावात पाणी योजना राबविण्यासाठी १ कोटी ९२ लाख रुपये खर्चून पाणी पुरवठा योजना राबवण्यात आली. इतकेच नाही तर या योजनेचे बिल देखील संबंधित ठेकेदाराला अदा करण्यात आले आहे. या योजनेतून ताडवागळे गावासह आदिवासी आश्रम शाळेलाही पाणी पुरवठा केला जाणार आहे. गेली सहा वर्षे योजनेचे काम सुरू होते. मात्र अद्यापही ग्रामस्थांना पाण्याचा एक थेंब देखील मिळाला नाही.
पाण्यासाठी वणवण
जिल्हा परिषदेअंतर्गत गावासाठी पाणी योजना मंजूर झाली होती. काम देखील सुरु करण्यात आले होते. यामुळे गावात लवकरच पाणी मिळणार अशी अपेक्षा गावकऱ्यांना होती. मात्र योजनेचे काम होत नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंतीच करावी लागत होती. योजनेसंदर्भात अनेकदा ग्रामपंचायतमध्ये तक्रार करून योजना लवकर पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र याचा उपयोग झाला नाही.
गावात बोलावली बैठक
पाणी योजनेचे काम अपूर्ण असल्याने यासंदर्भात चर्चा करण्यासाठी ग्रामस्थ, ठेकेदार आणि पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी यांची एकत्रित बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पाणी का मिळत नाही? असा प्रश्न उपस्थित करण्यात आल्यानंतर या प्रश्नाचे समाधान कारक उत्तर ठेकेदार विवेक पाटील देवू शकला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थ आणि महिलांनी त्याला बैठकीतच चोप दिला. या घटनेचा व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.