अक्षय गवळी, साम टीव्ही, प्रतिनिधी
अकोल्यातील मुंडगाव येथे एका घराला आग लागली. या आगीत बापलेक गंभीररित्या भाजले गेले. अचानक घरात आगीमुळे धूर दिसल्याने वडील मुलाला वाचवण्यासाठी धावले. दोघेही आगीच्या तावडीत सापडले. दोघांवर अकोल्यातील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते, उपाचारादरम्यान आधी मुलाचा आणि नंतर वडिलांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्याच्या अकोट तालुक्यातील मुंडगाव येथील बाजारपुरा येथे राहणारे सचिन हरिभाऊ ठाकरे यांच्या घराला आग लागली. घरातील बेडरुममध्ये त्यांचा नऊ वर्षांचा मुलगा स्वराज गाढ झोपेत असताना त्यांच्या बेडरुममधून धुर निघत असल्याने सचिन यांना दिसले. मुलाला वाचवण्यासाठी ते धावत गेले.
आगीतून बाहेर काढताना सचिन गंभीररित्या भाजले गेले. त्यांचा नऊ वर्षांचा मुलगा देखील भाजला गेला. गावकऱ्यांच्या मदतीने या बापलेकांना अकोला येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचार सुरु असताना मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर वडिलांचा देखील काही वेळाने मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सचिन ठाकरे यांच्या घराला लागलेली आग भीषण स्वरुपाची होती. अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल होण्याआधीच संपूर्ण घर आगीच्या आटोक्यात आले होते. तासभर प्रयत्न केल्यानंतर आग विझवण्यात यश आले. तोपर्यंत आगीत ठाकरे बाप-लेक गंभीर जखमी झाले होते. या आगीत अंदाजे सोने-चांदीचे ३ लाख ७५ हजार रुपयांचे दागिने, कपडे आणि घरगुती साहित्य आणि अंदाजे रोख रक्कम १ लाख ८५ हजार रुपये जळाले आहेत. शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.