Abdul Sattar News : कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. आधी गायरान जमीन प्रकरण, त्यानंतर कृषी महोत्सवाच्या नावाने पैसे गोळा केल्याचा आरोप आणि त्यानंतर आता सत्तार यांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी सीबीआयकडे दोन वेगवेगळ्या तक्रारी दाखल करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली यांच्यासह पाच जणांनी एकत्रित तक्रारी दाखल केल्या आहेत.
सत्तार यांच्यावर शेतकऱ्यांच्या जमीनी बळकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. तब्बल 1 हजार 400 पानांची तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीत एकूण 28 मुद्दे मांडण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी 200 पुराव्यानिशी तक्रार दाखल केली आहे. अब्दुल सत्तारांच्या विरोधात आजपर्यंत झालेल्या तक्रारींचा यामध्ये उल्लेख करण्यात आला आहे. सत्तार यांनी जमीन कशा बळकावल्या याचे पुरावे या तक्रारीत असल्याचा दावा देखील सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली यांनी केला आहे. दरम्यान याआधी अब्दुल सत्तार यांना गायरान प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कडक शब्दात सुनावत नोटीस पाठवली होती.
काय आहे गायरान प्रकरण?
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना अब्दुल सत्तार हे महसूल राज्यमंत्री होते. यावेळी त्यांनी वाशिम येथील 37.19 एकर गायरान जमिनीचे अवैध वाटप केल्याचा दावा हायकोर्टात करण्यात आला होता. सामाजिक कार्यकर्ते श्याम देवळे व संतोष पोफळे यांनी याबाबतची जनहित याचिका हायकोर्टात दाखल केली होती.
अब्दुल सत्तार यांनी सत्तांतराच्या अगोदर म्हणजे शिवसेनेतल्या फुटीच्या तोंडावर 17 जून 2022 रोजी 37 एकर गायरान जमीन योगेश खंडारे नामक व्यक्तीला वाटप करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना कोणत्याही कायदेशीर बाबींचे पालन केले गेले नाही असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. या सर्व प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटताना पाहायला मिळाले. हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात विरोधकांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.