शरद पवार संसदीय राजकारणातून निवृ-त्त होणार असल्याची जोरदार चर्चा रंगलीय. तब्बल सहा दशकांचा संसदीय राजकारणाचा प्रदीर्घ प्रवास थांबवण्याचे संकेत स्वत: पवारांनीच दिले आहेत. ..१९६७ पासून ते थेट २०२४ म्हणजे आताच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत सुरूवातीचे काही वर्ष सोडले तर राज्यातली प्रत्येक निवडणूक ही पवारांच्या भोवतीच लढली गेली.
पवारांनी २००४ मध्ये बारामतीतून अखेरची निवडणूक लढवली. आणि २००९मध्ये आपल्या मुलीसाठी बारामती सोडून बाजूच्या माढा मतदारसंघातून अखेरची लोकसभेची निवडणूक लढवली. त्यानंतर पवार निवृत्त होतात की काय अशी जोरदार चर्चा रंगली. मात्र पवारांनी राज्यसभेचा मार्ग स्वीकारला. त्यानंतर १५ वर्षं उलटली तरी प्रत्येक निवडणुकीच्या केंद्रस्थानी पवारच असतात.
मात्र आता आपण राज्यसभाही लढवावी की नाही याचा विचार करावा लागेल असं सांगत संसदीय राजकारणातूनही निवृत्तीचे संकेत पवारांनी दिले आहेत. पवारांनी गेल्या 57 वर्षांत विधीमंडळ आणि संसदेतल्या प्रत्येक सभागृहात आपलं योगदान दिलं आणि गाजवलं.
शरद पवार 1967 पासून विधानसभेत सहा वेळा आमदार म्हणून निवडून गेले. तर एका वेळा विधानपरिषदेवरही गेले. बारामतीतून 6 वेळा आणि माढ्यातून 1 वेळा असे सात वेळा लोकसभेची निवडणूक लढवली आणि तेवढ्याच मोठ्या फरकांनी जिंकली. तर राज्यसभेतही पवार खासदार म्हणून दोन वेळा निवडून गेले.
२०२६मध्ये पवारांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपतोय. मात्र बारामतीच्या प्रचारात पवारांनी संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत देताना तरुणांना संधी देण्यासाठी थांबायला हवं असं सांगायला ते विसरले नाहीत. त्यामुळे दादांनीही थांबावं आणि युगेंद्रसारख्या तरुणाला संधी द्यावी असंच पवारांना म्हणायचं तर नाही ना? कारण पवारांनी निवृत्तीचे संकेत देण्यासाठी विधानसभा निवडणुकीचं टायमिंग साधल्यामुळे त्यांची अधिकच चर्चा रंगलीय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.