अमर घटारे, साम टीव्ही
अमरावती : राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु असून कोणत्याही क्षणी आचारसहिंता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्षाचे राजकीय नेते जोरदार तयारीला लागले आहेत. निवडणुकीपूर्वी पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना आपल्याकडे खेचून आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. एकीकडे शरद पवार गटात इनकमिंग सुरु असताना दुसरीकडे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. अमरावतीतील तब्बल २५ पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अमरावती जिल्हाध्यक्ष पदावरून प्रदीप राऊत यांना पायउतार शरद पवार गटाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते नाराज झाले आहेत. त्यांनी बंडाचे हत्यार उपसले असून आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. त्यामुळे विधानसभेपूर्वी अमरावतीत शरद पवार गटाला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत प्रदीप राऊत यांच्याकडे अमरावती आणि वर्धा लोकसभा मतदारसंघाची प्रमुख जबाबदारी होती. मात्र ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांना जिल्हाध्यक्षपदावरून हटवण्यात आलं. तसेच त्यांच्याकडे प्रदेश संघटन सचिव ही नवी जबाबदारी देण्यात आली. यामुळे राऊत यांच्यासह त्यांचे समर्थक नाराज झाले.
त्यांनी तडकाफडकी आपल्या पदाचे राजीनामे दिले. पक्षाने आपल्याला विश्वासात न घेता पदावरून काढलं, अशी प्रतिक्रिया देत प्रदीप राऊत यांनी बंडाचे हत्यार उपसलं. "पाच महिन्यात आम्ही पक्ष संघटना मजबूत केली नव्या नेतृत्वाची फळी उभी केली, असं असताना कुठलंही कारण न देता किंवा चर्चा न करता आपल्याला पदावरून काढून टाकलं. हा आपल्या पक्षनिष्ठेचा व कार्याचा अवमान आहे"
त्यामुळे आपण प्रदेश संघटना सचिव पदाचा राजीनामा देत आहोत, असं प्रदीप राऊत यांनी सांगितलं. याबाबत आम्ही लवकरच ज्येष्ठ नेते शरद पवार आणि जयंत पाटील यांची भेट घेणार आहोत. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला तर ठीक अन्यथा, वेगळा निर्णय घेऊ असंही प्रदीप राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.