विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात जुन्याच मुद्यावरून नवं राजकारण रंगात आलंय. हा मुद्दा आहे. सिंचन घोटाळ्याचा.दर वेळी सिंचन घोटाळ्यावरून कुणी ना कुणी अजित पवारांना घेरण्याचा प्रयत्न करत असतं. मात्र यावेळी हा मुद्दा स्वत: अजित पवारांनीच उकरून काढलाय.तो का काढला? त्यावरून दादांनी दिवंगत आर आर पाटलांवर काय आरोप केले यावरचा हा विशेष रिपोर्ट.
उमेदवारी अर्ज भरल्याची मुदत संपली आणि अजित पवारांनी प्रचारासाठी पहिला मतदारसंघ गाठला तो थेट आर आर पाटलांचा तासगाव.तासगावमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीकडून आर आर पाटलांचा मुलगा रोहित निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यांच्याविरोधात अजित पवारांनी तासगावच्या रिंगणात संजयकाका पाटलांसारखा तगडा उमेदवार उतरवलाय.
मात्र तरीही दादांनी प्रचारात लक्ष्य केलं ते दिवंगत आर आर पाटलांना. आणि मुद्दा उकरून काढला तो सिंचन घोटाळ्याचा.सिंचन घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन गृहमंत्री आर आर आबांनी आपला केसानं गळा कापल्याचा घणाघाती आरोप दादांनी केलाय.
अजित पवारांच्या आरोपांना पवारांच्या राष्ट्रवादीनं जोरदार उत्तर दिलंय. आबा जाऊन दहा वर्ष झाली. दादांना आताच कशीकाय जाग आली? असा खोचक सवाल जितेंद्र आव्हाडांनी केलाय. एवढंच नव्हे तर यानिमित्तानं त्यांनी थेट दादांची संस्कृतीच काढली. आर आर पाटलांचा मुलगा आणि तासगावचा उमेदवार रोहित पाटलांनी मात्र दादांवर टीका न करता उलट दादांच्या विधानामुळे दु:ख झाल्याची खंत व्यक्त केली.
1999 ते 2009 या काळात सिंचन प्रकल्पांच्या बांधकामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप
सिंचनावर 70 हजार कोटी खर्च मात्र सिंचनात 0.1% सुधारणा
सरकारच्याच कॅग अहवालात नोंदवलं निरीक्षण
सिंचन प्रकल्पांच्या कंत्राट वाटपात अनियमिततेचा कॅगकडून ठपका
याच काळात जलसंपदामंत्रिपद अजित पवारांकडे
अनेक भाषणांमधून आर आर आबांच्या कार्यशैलीचं कौतुक करणा-या दादांनी आबांच्याच मतदारसंघात जाऊन मोठे आरोपांचे फटाके फोडल्यामुळे मोठी खळबळ माजलीय. विशेष म्हणजे दादांनी थेट फडणवीसांचाच हवाला दिलाय. त्यामुळे ही लढाई पुन्हा दादा विरूद्ध काका अशीच रंगण्याची शक्यता तर आहेत. पण यामुळे दादांसाठी तासगावची लढाई अधिक सोपी झाली आहे की कठीण हे निकालातच स्पष्ट होईल.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.