महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. मात्र महायुतीला वरळीची जागा काबिज करता आली नाही. वरळीच्या जागेवर महाविकास आघाडीचे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे विजयी झाले आहेत. या मतदार संघातून हा आदित्य ठाकरे यांचा सलग दुसरा विजय आहे.
वरळीमध्ये यंदाच्या निवडणूकीत शिवसेना विरूद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळाली होती. यामध्ये आदित्य ठाकरे विरूद्ध मिलिंद देवरा यांच्यामध्ये चुरशीची लढत झाली. पहिल्या फेरीतील मतमोजणीत आदित्य ठाकरे आघाडीवर होते. मात्र त्यानंतर मिलिंद देवरा काही मतांच्या फरकाने आघाडीवर होते. अखेर या चुरशीच्या सामन्यात अखेर आदित्य ठाकरेंनी बाजी मारली आणि त्यांचा विजय झाला.
आदित्य ठाकरेंना वरळी मतदार संघामध्ये ६० हजारांहून अधिक मतं मिळाली. वैयक्तिक प्रचारासोबत पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेण्याची दुहेरी जबाबदारी आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर होती. त्यांनी प्रचारात स्वतःला झोकून दिलं होतं. अखेरीस वरळीच्या जागेवर त्यांचा विजय झाला आहे.
वरळीमध्ये निवडून आल्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले की, वरळीमध्ये जिंकल्याने मी सर्वांचे आभार मानतो. ज्या ठिकाणी आमच्या जागा आल्या आहेत, त्या त्या ठिकाणच्या नागरिकांचे मी आभार मानतो. संपूर्ण महाराष्ट्राचे निकाल मात्र जसे अपेक्षित आहेत तसे मिळाले नाहीत. यासंदर्भात उद्धवसाहेब बोलतील. एकंदरीत निकालावरून महाराष्ट्राने मतदान केलं की ईव्हीएमने मतदान केलं हा प्रश्न समोर येतोच. याबाबत नंतर आम्ही चर्चा करूच.
आदित्य यांनी वरळीमध्ये केलेली कामं मतदारांपुढे ठेवत वरळी कोळीवाडा इथल्या क्लस्टरला असलेला विरोध मतदारांपर्यंत पोहोचवला होता. याशिवाय तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्याकडून आदित्य ठाकरेंसाठी सभा घेण्यात आली होती. स्थानिक नेत्यांची फौज आणि परंपरागत मतदारांची साथ यामुळे त्यांचं पारडं जड मानलं जात होतं.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालांचे ताजे अपडेट इथं वाचा...
Maharashtra All Constituency Assembly Election results Updates
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.