बारामती लोकसभा मतदारसंघासाठी (Baramati Lok Sabha Constituency) महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना उमेदवारी देण्यात आली आहेत. सुप्रिया सुळे या लोकसभा मतदारसंघातून आधीच खासदार होत्या. आता त्या पुन्हा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने उमेदवारी दिली आहे. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून जोरदार तयारी केली जात आहे. आपल्या मुलीच्या प्रचारासाठी शरद पवार (Sharad Pawar) यांची पहिली जाहीर सभा दौंडमध्ये होणार आहे. या सभेचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. सध्या शरद पवार यांच्या सभेचा टीझर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांची येत्या सोमवारी म्हणजेच १५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता दौंडमध्ये सभा होणार आहे. दौंड तालुक्यातील यवतमधील बाजारतळ मैदानात या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या पक्षाकडून सभेसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. आपल्या मुलीसाठी शरद पवार यांची ही पहिलीच प्रचारसभा असणार आहे. त्यामुळे या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सभेमध्ये शरद पवार नेमकं काय बोलणार याकडे सर्व राजकीय पक्षांचे आणि पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
या टीझरची सुरूवातच शरद पवार यांच्या फोटोसह 'वस्ताद येतोय आपल्या भेटीला...' अशी होते. त्यानंतर या टीझरमध्ये शरद पवार एका सभेमध्ये बोलताना दिसत आहे. ते बोलतात की, 'माझी विनंती आहे त्यांना दमदाटीचे राजकारण या तिघांनी कधी केले नाही आणि जर कोणी केले तर त्याला त्याची जागा दाखवली जाईल. त्याला सोडणार नाही. सरळ आहे तोपर्यंत सरळ. कोणी वाकडे पाऊल टाकले तर तो पाय काढणार.', असा इशारा शरद पवार देताना दिसत आहे.
या टीझरमध्ये सुप्रिया सुळे आणि रोहित पवार देखील भाषण करताना दिसत आहे. सुप्रिया सुळे म्हणताना दसतात की, 'श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचे पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी.' तसंच त्या पुढे म्हणतात की, 'सत्ता-सत्ता काय फक्त ५० खोके एकदम ओकेसाठी नाहीये.' तर या टीझरमध्ये रोहित पवार देखील एका सभेदरम्यान बोलताना दिसत आहेत. ते म्हणतात की, 'आणि सहज तुम्ही सत्तेसाठी लोकांना सोडून गेला. कुटुंब आणि पार्टी फोडून इलेक्शन लढणे हे लोकांना पटत नाही. लोकांसाठी विचार महत्वाचे आहेत.', असे म्हणत ते राष्ट्रवादीत बंडखोरी केलेल्या अजित पवार यांना टोला लगावताना दिसत आहेत.
दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पवार घराण्यातून दोन उमेदवार आमने-सामने आले आहेत. महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे यांना या मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या मतदार संघामध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यामध्ये लढत होणार आहे. सुनेत्रा पवार यांच्यासाठी देखील महायुतीकडून ठिकठिकाणी सभा घेतल्या जात आहेत. गुरुवारी सासवडमध्ये पार पडलेल्या महायुतीच्या सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विजय शिवतारे यांनी हजेरी लावली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.