ग्रामीण भागातील अनेक महिलांना आजही ब्रेस्ट कॅन्सरबाबत पुरेशी माहिती नाही. स्तनामध्ये गाठ जाणवणं किंवा स्तनाच्या आकारात बदल होणं यांसारखी लक्षणं दिसल्यानंतरही अनेक महिला डॉक्टरांकडे जाण्यास उशीर करतात. त्यामुळे काही महिलांमध्ये या आजाराचं निदान उशिरा होतं. हा धोका टाळण्यासाठी ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणं ओळखणं, स्वतः स्तनाची तपासणी करणं आणि गरज पडल्यास वेळेत डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे, असं डॉक्टरांनी सांगितलंय.
पुण्यातील अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अँड चिल्ड्रनमधील वरिष्ठ प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रसाद कुलट यांनी ग्रामीण भागातील महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरबाबत जागरूकता वाढवण्याची गरज व्यक्त केलीये.
ग्रामीण भागातील अनेक महिलांना स्वतःच्या स्तनांची तपासणी कशी करायची, याची माहिती नसते. त्यामुळे स्तनाच्या आरोग्याबाबत महिलांना योग्य माहिती मिळणे गरजेचं आहे. वयाच्या २५ वर्षांनंतर महिन्यातून किमान एकदा स्वतःच्या स्तनांची तपासणी करावी, असं डॉक्टरांनी सांगितलंय.
स्तनाची तपासणी करताना काही बदल जाणवतात का, याकडे लक्ष द्यावं. स्तनामध्ये गाठ जाणवणं, स्तनाच्या आकारात बदल होणं, त्वचा लाल होणं किंवा त्वचेची जाडी वाढणं, स्तनाग्र आतल्या बाजूला ओढलं जाणं, स्तनाग्रातून पाणी किंवा रक्त येणं आणि स्तनामध्ये अचानक वेदना होणं ही काही महत्त्वाची लक्षणे आहेत.
ग्रामीण भागात आरोग्य सुविधा आणि वैद्यकीय तपासणीसाठी लागणारी साधनं मर्यादित प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचं वेळेत निदान होण्यात अडचणी येतात. अनेक महिलांना या आजाराची लक्षणे माहीत नसल्याने त्या बराच काळ त्रास सहन करतात. काही महिला आजाराची लक्षणं वाढल्यानंतर किंवा प्रकृती खालावल्यानंतरच रुग्णालयात जातात. त्यामुळे उपचार सुरू होण्यास उशीर होतो. परिणामी कॅन्सर गंभीर टप्प्यावर पोहोचण्याचा धोका वाढतो. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांपर्यंत ब्रेस्ट कॅन्सरची माहिती पोहोचवणं आणि त्यांना वेळेत तपासणी करून घेण्यासाठी प्रोत्साहित करणं आवश्यक आहे.
ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढवणाऱ्या काही गोष्टींची माहिती महिलांना असणं गरजेचं आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला ब्रेस्ट कॅन्सर झाला असेल तर त्या महिलांनी आपल्या आरोग्याबाबत अधिक जागरूक राहावं. तसंच लठ्ठपणा आणि धूम्रपान यांसारख्या घटकांमुळेही कॅन्सरचा धोका वाढू शकतो. महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं. आरोग्यामध्ये काही बदल जाणवल्यास किंवा गरज भासल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
ब्रेस्ट कॅन्सरचं लवकर निदान झाल्यास उपचार वेळेत सुरू करता येतात. शस्त्रक्रिया आणि रेडिएशन थेरपी यांसारख्या उपचारांमुळे रुग्णाच्या बरे होण्याची शक्यता वाढू शकते. काही रुग्णांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात कॅन्सरचं निदान झाल्यास संपूर्ण ब्रेस्ट काढण्याची गरज पडत नाही. अशा वेळी केवळ कॅन्सर झालेला भाग काढून शस्त्रक्रिया करणं शक्य होऊ शकतं. त्यामुळे आजाराची लक्षणं ओळखून वेळेत वैद्यकीय मदत घेणं महत्त्वाचं ठरतं.
ब्रेस्ट कॅन्सर टाळण्यासाठी किंवा त्याचं वेळेत निदान होण्यासाठी महिलांनी आपल्या स्तनांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. महिन्यातून एकदा स्वतःच्या स्तनांची तपासणी करावी. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक त्या नियमित तपासण्या करून घ्याव्यात. स्तनामध्ये गाठ जाणवणं, त्वचेत बदल होणे किंवा इतर कोणतेही संशयास्पद लक्षण दिसल्यास उपचारासाठी उशीर करू नये. तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.