Manasvi Choudhary
प्रवासात ट्रॉली बॅग अत्यंत महत्वाची असते. ट्रेन, बस किंवा फ्लाईटने तुम्ही प्रवास करत असाल तर ट्रॉली बॅग कम्फर्टेबल वाटते.
परंतु, सततच्या प्रवासामुळे आणि बॅग ठेवून राहिल्यामुळे तिच्यावर धूळ, माती आणि तेलकट डाग साचतात, ज्यामुळे बॅगेची चमक कमी होते.
अशा वेळी नवीन बॅग खरेदी करण्याऐवजी काही सोप्या घरगुती उपायांनी तुम्ही तुमची जुनी बॅग पुन्हा नव्यासारखी चकाचक करू शकता.
ट्रॉली बॅग स्वच्छ करण्यासाठी सर्वात आधी ती पूर्णपणे रिकामी करा. बॅगेचे सर्व छोटे-मोठे कप्पे उघडून त्यात जुनी तिकिटे, बिले, कागदपत्रे किंवा इतर वस्तू राहिल्या आहेत का ते तपासा. त्यानंतर व्हॅक्यूम क्लिनरच्या मदतीने बॅगेचे सर्व कोपरे आणि आतील भागातील धूळ व कचरा स्वच्छ करा.
बॅगेच्या बाहेरील भागावर साचलेली धूळ मऊ ब्रश किंवा कोरड्या सुती कापडाने हलक्या हाताने पुसून घ्या. बॅगेवर जोरात घासू नका, अन्यथा बॅगेच्या पृष्ठभागावर ओरखडे पडू शकतात.
एका बादलीत कोमट पाणी घेऊन त्यात थोडे डिटर्जंट किंवा लिक्विड सोप मिक्स करा. या पाण्यात एक स्वच्छ सुती कापड भिजवून घट्ट पिळून घ्या आणि त्याने बॅगेची बाहेरील बाजू नीट पुसून घ्या.
जर तुमच्या ट्रॉली बॅगवर तेलकट किंवा हट्टी डाग पडले असतील, तर थोड्या पाण्यात बेकिंग सोडा मिसळून त्याची पेस्ट तयार करा आणि डाग असलेल्या भागावर लावा. ५ ते १० मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर ओल्या सुती कापडाने स्वच्छ पुसून घ्या.
अनेकदा आपण बॅगेचा मुख्य भाग स्वच्छ करतो, पण चेन आणि ट्रॉली हँडलकडे दुर्लक्ष करतो. या भागांवरही मोठ्या प्रमाणात धूळ साचलेली असते. ही धूळ काढण्यासाठी मऊ टूथब्रशचा वापर करा.
प्रवासात बॅगेची चाके जमिनीवरून फिरत असल्याने त्यात केस, धागे आणि माती अडकते. चाकांमध्ये अडकलेले केस व घाण काढण्यासाठी चिमट्याचा वापर करा आणि त्यानंतर साबणाच्या पाण्याने चाके स्वच्छ धुवून कोरडी करा.