हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला अत्यंत पवित्र आणि धार्मिक महत्व आहे. हा महिना भगवान श्रीकृष्णाला समर्पित केला जातो. या महिन्यात भक्तांनी केलेले व्रत, जप, दान आणि पूजेला विशेष पुण्य मिळते, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे अनेकजण या महिन्यात सात्त्विक आहार घेतात, श्रीकृष्णाची भक्ती करतात आणि महालक्ष्मी देवीची पालखी सजवून पूजा करतात.
यंदा मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात शुक्रवार, २१ नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्याच्या आधी गुरुवार, २० नोव्हेंबरला कार्तिक अमावस्या असेल. मार्गशीर्ष महिना सुरू होताच घराघरांत धार्मिक विधी, उपासना आणि दानधर्माची परंपरा पाळली जाते. या महिन्यात एकूण चार गुरुवार येणार असून पहिला मार्गशीर्ष गुरुवार २७ नोव्हेंबर रोजी आहे.
मार्गशीर्ष महिन्यात सकाळी लवकर उठून श्रीकृष्णाची पूजा करण्याची प्रथा आहे. अनेकजण ब्रह्ममुहूर्तावर उठून श्रीकृष्णाला धुपारती करतात, मंत्रजप करतात आणि भगवद्गीतेचे पठण करतात. असं मानलं जाते की या काळात श्रीकृष्णाच्या नामस्मरणाने मन:शांती आणि पुण्य प्राप्त होतं. या दरम्यान अन्नदान करण्याला सुद्धा खूप महत्व दिलं जातं. गरीब आणि गरजू व्यक्तींना अन्नधान्य, वस्त्रे किंवा आवश्यक वस्तू देणे अत्यंत शुभ मानलं जातं.
मार्गशीर्ष महिन्यात देवी महालक्ष्मीच्या व्रतालादेखील मोठं महत्व आहे. विवाहित स्त्रिया प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीची पूजा करतात. पाटावर देवीची सुंदर मांडणी केली जाते. व्रताची कथा वाचून आरती केली जाते आणि देवीला खिरीचा नैवेद्य दाखवला जातो. शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते. यावेळी सात सुवासिनींना घरी बोलावून त्यांना शृंगाराचे सामान, व्रतकथा पुस्तक आणि केळी ओटीत घालून दिले जाते. त्यानंतर त्यांचे आदरातिथ्य करून जेवण दिले जाते. या विधीनंतर मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत पूर्ण होते, असे मानले जाते. मार्गशीर्ष महिना हा भक्ती, सात्त्विकता आणि पुण्यसंचयाचा महिना म्हणून ओळखला जातो. या काळात केलेल्या उपासना आणि दानामुळे देवी-देवतांची कृपा लाभते, असा विश्वास अनेक घरांमध्ये आजही आहे.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.