डायबिटीजचा त्रास असलेल्या व्यक्तींना ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. आहार, व्यायाम आणि औषधांसोबतच रोजच्या सवयींचाही शुगरवर परिणाम होतो. त्यामुळे नकळत होणाऱ्या काही छोट्या चुका टाळणं गरजेचं आहे. कमी झोप घेणं, जास्त ताण घेणं आणि जेवल्यानंतर हालचाल न करणं अशा सवयींमुळे ब्लड शुगर वाढू शकतो.
डायबिटीज म्हणजेच मधुमेह असलेल्या व्यक्तींनी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. शुगर वारंवार वाढत राहिल्यास आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलेली औषधे घेण्यासोबतच तुमच्या रोजच्या जीवनशैलीकडेही लक्ष देणं आवश्यक आहे.
डायबिटीज असणाऱ्या व्यक्तींनी पुरेशी झोप घेणं महत्त्वाचं आहे. रोज साधारण सात ते आठ तास झोप घेण्याचा प्रयत्न करा. कमी झोप घेतल्यास किंवा रात्री गाढ झोप लागत नसल्यास शरीरातील ग्लुकोज आणि इन्सुलिनचं संतुलन बिघडू शकतं. कमी झोपेमुळे शरीरात कोर्टिसोल नावाचं हार्मोन वाढतं. या हार्मोनचा परिणाम रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवर होऊ शकतो. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत जागणं आणि सतत कमी झोप घेणं टाळा.
जेवल्यानंतर लगेच बराच वेळ बसून राहणं किंवा झोपणं ही सवयही टाळायला हवी. तुम्ही फक्त सलाड खाल्लं असलं तरी खाल्ल्यानंतर थोडी हालचाल करणं फायदेशीर ठरू शकतं. काहीही खाल्ल्यानंतर अजिबात चाललं नाही तर ब्लड शुगर वाढू शकतो आणि शुगर स्पाइक होण्याची समस्या निर्माण होऊ शकते.
सततचा ताण आणि चिंता यांचाही ब्लड शुगरवर परिणाम होऊ शकतो. तुम्ही खूप तणावात असाल तर शरीरात कोर्टिसोलची पातळी वाढते. कोर्टिसोल वाढल्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढू शकतं. त्यामुळे डायबिटीज असलेल्या व्यक्तींनी शक्य तितका ताण कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा. यासाठी रोज थोडा वेळ चालणं, आवडीचं काम करणं आणि पुरेशी विश्रांती घेणं उपयोगी ठरू शकतं.
यासोबतच वेळेवर जेवण करणं, डॉक्टरांनी सांगितलेली औषधं नियमित घेणं आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ब्लड शुगर तपासणंही महत्त्वाचं आहे. ब्लड शुगर वारंवार वाढत असेल तर स्वतःहून औषधांचा डोस बदलू नका.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.