Bile duct stones saam tv
लाईफस्टाईल

Bile duct stones: गर्भावस्थेतील पोटदुखी आणि उलट्या समजून केलं दुर्लक्ष; २० आठवड्यांच्या गर्भवतीच्या पित्तनलिकेत निघाले तब्बल १५ खडे

Bile duct stones during pregnancy: २० आठवड्यांच्या गर्भवती महिलेच्या पित्तनलिकेत अडकलेले १५ खडे ERCP प्रक्रियेद्वारे अवघ्या १५ मिनिटांत काढण्यात आले. एक्स-रेचा धोका कमी ठेवत केलेल्या उपचारामुळे संसर्ग, कावीळ आणि गंभीर गुंतागुंत टाळण्यात डॉक्टरांना यश आले.

Surabhi Jayashree Jagdish

गर्भावस्थेत होणारी पोटदुखी आणि उलट्या हा नेहमीचा त्रास असेल असं समजणं २७ वर्षीय महिलेला महागात पडलं असतं. काही दिवसांनी त्यांना ताप आला आणि डोळेही पिवळे झाले. तपासणी केल्यानंतर त्यांच्या पित्तनलिकेत अनेक खडे अडकून संसर्ग झाल्याचे समोर आलं. महत्त्वाचं म्हणजे त्यावेळी त्या २० आठवड्यांच्या गर्भवती होत्या.

नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले. गर्भाला होणारा एक्स-रेचा धोका कमीत कमी ठेवत डॉक्टरांनी ERCP ही प्रक्रिया केली. या प्रक्रियेत पित्तनलिकेत अडकलेले ७ ते ८ मिमी आकाराचे तब्बल १५ खडे काढण्यात आले. ही संपूर्ण प्रक्रिया अवघ्या १५ मिनिटांत पूर्ण झाली.

या महिलेची ही पहिलीच गर्भधारणा होती. सुरुवातीला पोटदुखी आणि उलट्या गर्भावस्थेमुळे होत असाव्यात, असं त्यांना वाटलं. त्यांनी स्थानिक डॉक्टरांकडून उपचारही घेतले. मात्र उपचारांनंतरही त्रास वाढत गेला. त्यानंतर डोळे पिवळे होणं, ताप आणि अशक्तपणा जाणवू लागल्याने कुटुंबीयांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

रक्त तपासणीत त्यांच्या पांढऱ्या रक्तपेशींची संख्या १३,५०० प्रति मायक्रोलिटर झाली होती. लिव्हरच्या काही टेस्ट केल्या असता त्यामध्येही चांगले रिझल्ट दिसले नाहीत. अल्ट्रासाऊंडमध्ये पित्ताशयात अनेक खडे दिसले. त्यानंतर MRCP तपासणीत पित्तनलिकेत अनेक खडे अडकले असल्याचं स्पष्ट झालं.

मेडिकव्हर हॉस्पिटल्सचे मेडिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, हेपॅटोलॉजिस्ट आणि थेरप्युटिक एंडोस्कोपिस्ट डॉ. रावसाहेब राठोड यांनी सांगितलं की, रुग्णालयात दाखल होताना महिलेला तीव्र पोटदुखी, ताप आणि पित्त अडकल्यामुळे कावीळ झाली होती. उपचाराला उशीर झाला असता तर परिस्थिती गंभीर होऊ शकली असती. त्यामुळे शिरेतून Antibiotics आणि द्रव देऊन तातडीने उपचार सुरू करण्यात आले. मात्र केवळ औषधांनी खडे निघणार नसल्याने ERCP करून खडे काढणं आणि पित्तनलिकेत स्टेंट बसवणं आवश्यक होतं.

गर्भावस्थेत अशा प्रक्रियेदरम्यान एक्स-रेचा वापर करावा लागतो. त्यामुळे गर्भाच्या सुरक्षिततेसाठी डॉक्टरांनी विशेष काळजी घेतली. लीड शिल्डिंगचा वापर करण्यात आला आणि इमेजिंग केवळ एका नियंत्रित एक्स-रे शॉटपुरतं ठेवण्यात आलं.

वेळीच उपचार झाल्याने यकृत निकामी होणं, रक्तातील गंभीर संसर्ग आणि स्वादुपिंडाला सूज येण्यासारख्या गुंतागुंती टाळता आल्या. उपचारानंतर दुसऱ्याच दिवशी महिलेला घरी सोडण्यात आलं. सात दिवसांनी केलेल्या रक्त तपासण्या नॉर्मल आल्यात. त्यांना चरबीयुक्त पदार्थ टाळण्याचा आणि पुन्हा ताप, पोटदुखी किंवा कावीळ झाल्यास तातडीने रुग्णालयात येण्याचा सल्ला देण्यात आला

गर्भावस्थेत पित्ताशयातील खड्यांमुळे पित्तनलिकेत अडथळा निर्माण होऊन कावीळ होणं दुर्मीळ आहे. साधारण १२०० गर्भवती महिलांपैकी एका महिलेला अशी समस्या होऊ शकते. त्यापैकी सुमारे ५ ते १० टक्के महिलांना संसर्ग होण्याचा धोका असतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT